नाशकात गोदावरीचे गटारीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:31 AM2019-12-10T01:31:47+5:302019-12-10T01:32:18+5:30
शहराला दररोज सुमारे ४.५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातील ६५ टक्के प्रक्रियायुक्त सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळते. शहरात महापालिकेने उभारलेले मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र जुने असल्याने आणि त्याची क्षमता अपुरी असल्याने नदीचे गटारीकरण झाले आहे.
नाशिक : शहराला दररोज सुमारे ४.५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातील ६५ टक्के प्रक्रियायुक्त सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळते. शहरात महापालिकेने उभारलेले मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र जुने असल्याने आणि त्याची क्षमता अपुरी असल्याने नदीचे गटारीकरण झाले आहे. परिणामी, जलचरांसोबत माणसांचेही आरोग्य बिघडले असून, शेतीवरही विपरीत परिणाम होत आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते. मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाते, असा दावा पालिकेकडून केला जातो. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. त्यामुळे गोदावरीचे गटारीकरण झाले आहे.
नाशिक व मराठवाडा मिळून सुमारे ६६ लाख हेक्टरपैकी १६ टक्के शेती क्षेत्राला गोदेच्या पाण्याचा फायदा झाला आहे. मात्र, प्रदूषित पाण्यामुळे गोदाकाठच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच नागरिकांना डोळ्यांची जळजळ, त्वचेला खाज सुटणे, डोकेदुखी, आदी तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. - देवांग जानी,
अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती.
गोदा प्रदूषणावर महापालिकेकडून उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दर २ महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावयाचा आहे.