गोदावरी, महिला विकास बँकेची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 01:45 AM2022-07-07T01:45:25+5:302022-07-07T01:46:04+5:30
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.६) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. बहुसंख्य उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नाशिकची गोदावरी अर्बन बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, मनमाड येथील प्रगती सहकारी बँक या प्रमुख संस्थांचा समावेश आहे.
नाशिक : जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची धूम सुरू असून २० जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.६) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. बहुसंख्य उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नाशिकची गोदावरी अर्बन बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, मनमाड येथील प्रगती सहकारी बँक या प्रमुख संस्थांचा समावेश आहे. दरम्यान शिक्षकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या एनडीएसटी क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत ६६ उमेदवारांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीत तीन पॅनल तयार झाले आहेत. मागील महिन्यांपासून जिल्ह्यातील ३१ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून बुधवारी काही संस्थांच्या माघारीची अंतिम मुदत होती. गोदावरी बँकेच्या १५ जागांसाठी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या मुदतीत उर्वरित उमेदवारांनी माघार घेतल्याने या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर नाशिक जिल्हा महिला विकास बँकेच्या १५ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. विशेष म्हणजे छाननीत एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झाला नाही. यामुळे या बँकेचीही निवडणूक होते की काय याकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मात्र बुधवारी माघार घेणारे सर्व उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. मुदतीत माघारीचा अर्ज दाखल केल्याने या बँकेचीही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मनमाड येथील प्रगती बँकेची निवडणूकही बिनविरोध झाली आहे. गणेश सहकारी बँक, राजलक्ष्मी बँक या बँकांच्या माघारीची मुदत १४ जुलैपर्यंत आहे. दरम्यान येवला मर्चंट बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या बँकेसाठी गुरुवारपासून (दि. ७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.