नाशकात गोदावरीचे गटारीकरण, जलचर, माणसांचे आरोग्य बिघडले
By अझहर शेख | Published: December 10, 2019 11:16 AM2019-12-10T11:16:20+5:302019-12-10T11:17:23+5:30
नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते.
- अझहर शेख
नाशिक - शहराला दररोज सुमारे ४.५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातील ६५ टक्के सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळते. शहरात महापालिकेने उभारलेले मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र केवळ नावालाच असल्याने या नदीचे चक्क गटारीकरण झाले आहे. परिणामी, जलचरांसोबत माणसांचेही आरोग्य बिघडले असून, शेतीवरही विपरीत परिणाम होत आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते.
मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाते, असा दावा पालिकेकडून केला जातो. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. त्यामुळे गोदावरीचे गटारीकरण झाले आहे.
गोदा प्रदूषणावर महापालिकेकडून उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दर २ महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावयाचा आहे.
361 गावे गोदेवर अवलंबून
नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या तीन तालुक्यांमधील सुमारे ३६१ गावे गोदावरीच्या खोºयावर अवलंबून आहेत. गोदेच्या प्रदूषणाचा या सर्व गावांना फटका बसत आहे.
डोळ्यांची जळजळ आणि दुर्गंधी
नाशिक व मराठवाडा मिळून सुमारे ६६ लाख हेक्टरपैकी १६ टक्के शेती क्षेत्राला गोदेच्या पाण्याचा फायदा झाला आहे. मात्र, प्रदूषित पाण्यामुळे गोदाकाठच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच गोदेकाठच्या नागरिकांना डोळ्यांची जळजळ, त्वचेला खाज सुटणे, डोकेदुखी, दुर्गंधी आदी आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. - देवांग जानी,
अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती, नाशिक