गोदा युनियन : नव्या नियमामुळे एक हजार ८४० सभासद मतदानास मुकणार
By admin | Published: January 24, 2015 11:25 PM2015-01-24T23:25:53+5:302015-01-24T23:46:36+5:30
नायगाव खोऱ्यात मोर्चेबांधणीला वेग
नायगाव- प्रारुप मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात आल्याने गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पॅनल निर्मितीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षण सोडतही काढण्यास प्रारंभ झाल्याने नायगाव खोऱ्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. गोदा युनियन पाठोपाठ लागलीच ग्रामपंचायत निवडणुकाही होणार असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी वेग दिला आहे.
विद्यमान संचालक मंडळाची मुदत जून २०१३ मध्येच संपली आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकींसह अन्य कारणांमुळे या संचालक मंडळाला दीड वर्षांहून अधिक अतिरिक्त काळ सत्ता उपभोगता आली. यामुळे अनेकांना अध्यक्ष व उपाध्यक्षपद भूषविण्याची हौसही भागवता आली.
सध्या सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर गोदा युनियनचाही निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. सध्या प्रारूप मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. यामुळे इच्छुक उमेदवार व पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांनी व्यूहरचनेस प्रारंभ केला आहे.
सध्याच्या राजकीय स्थितीवरून या निवडणुकीत तीन पॅनल निर्माण होण्याचे चित्र असले, तरी ऐनवेळी एकमेकांना शह देण्यासाठी सरळ लढत होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. उमेदवारांच्या चाचपणीसाठी बैठकांनी जोर धरला आहे. कोपरा बैठकांचीही संख्या वाढू लागल्याने राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. गोदा युनियनच्या नव्या नियमामुळे थकबाकीदार सभासदांना मतदान व उमेदवारी दोन्हींवर पाणी सोडावे लागणार आहे.
गोदा युनियनची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावनिहाय बैठक घेत इच्छुकांची दोन्हीकडे विभागणी झाल्यास बिनविरोध निवडणूकही शक्य असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
गेल्या निवडणुकीत सतरा जागांसाठी चौपन्न उमेदवार रिंगणात होते. शेतकरी व शेतकरी विकास या दोन पॅनलमध्ये मुख्य लढत झाली होती. मात्र, यंदाच्या निवडणूकीत केवळ तेरा जागा असल्याने गावनिहाय उमेदवारी निश्चित करणे कठीण जात आहे.
राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सहकारी कृषक सोसायटी म्हणून नावारूपास आलेल्या व नायगाव खोऱ्याची अर्थवाहिनी असलेल्या गोदा युनियन संस्थेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आपल्या पॅनलमध्ये अमुक गावचा तमुक उमेदवार घेतला, तर होणाऱ्या नफ्या-तोट्यांची आकडेमोड पॅनलच्या नेतृत्वांकडून करण्यात येत आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पूर्वतयारीला शासकीयस्तरावर वेग आला आहे. अनेक गावांत लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या वाढल्याने प्रभागनिहाय आरक्षण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नायगाव खोऱ्यात गोदा युनियनसह ग्रामपंचायत निवडणुकीच्याही व्यूहरचनेस प्रारंभ झाला आहे. पाठोपाठ आलेल्या दोन्ही निवडणुकांमुळे नायगाव खोऱ्यात राजकीय समीकरणे कोणत्या वळणावर जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)