नाशिककरांना सतर्कतेचा इशारा; गोदावरीला १२ वाजेपर्यंत मोठा पूर येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:12 AM2021-09-29T11:12:14+5:302021-09-29T11:21:24+5:30

नदीच्या पाण्यात भरीव वाढ होऊन मोठा पूर येऊ शकतो.

Godavari will be flooded till 12 noon today; Warning to Nashik residents | नाशिककरांना सतर्कतेचा इशारा; गोदावरीला १२ वाजेपर्यंत मोठा पूर येण्याची शक्यता

नाशिककरांना सतर्कतेचा इशारा; गोदावरीला १२ वाजेपर्यंत मोठा पूर येण्याची शक्यता

googlenewsNext

 नाशिक:  गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असून आज दुपारी १२ वाजेपर्यंत विसर्गात वाढ करुन  १५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होऊन मोठा पूर येऊ शकतो. नदीकाठलगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नांदगाव, दिंडोरीसह आसपासच्या भागास मुसळधार पावसाने झोडपले. नांदगावमधील काही भागांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. जिल्ह्यातील साकुरी गावची गाव नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. कांदा, बाजरी, कपाशी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तीनदा झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे नदीला आलेला पूर, झालेले नुकसान, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान अजून मिळालेले नाही, नुसता पंचनामा केला जातो, परंतु शासनाकडून भरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे.

दरम्यान, २८ तारखेलाही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा येवला तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर तुलनेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुरळक पाऊस होता. मंगळवारी पहाटेपासून नाशिक, दिंडोरी, नांदगाव व आसपासच्या भागात पावसाने  जोर पकडला. नांदगावला अतिवृष्टीचा तडाखा बसला. पुरामुळे काही भागांशी संपर्क खंडित झाला होता.

Read in English

Web Title: Godavari will be flooded till 12 noon today; Warning to Nashik residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.