गोदावरीतील पाणवेली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:10 AM2018-04-14T00:10:45+5:302018-04-14T00:10:45+5:30
ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी केली.
सायखेडा : ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी केली. यावेळी जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. येत्या दोन दिवसांत पाणवेली काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे खेडकर यांनी कदम यांना सांगितले. सायखेडा परिसरात अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात चाटोरी गावाच्या जवळपासदोन किलोमीटर अंतरापर्यंत पाणवेली पसरलेल्या आहेत. पाणवेलीने गोदावरीचे पाणी दुषित झाल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडलेआहेत. परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणवेली एकाच ठिकाणी अडकल्याने पाण्याचा प्रवाह थांबला असून, दुर्गंधी पसरली आहे. अनेक साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आमदार कदम यांनी भेट देऊन पात्राची पाहणी करून प्रशासनाला आदेश दिले. कटर आणि जेसीबीच्या साह्याने पाणवेली काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी महेंद्र जाधव, शरद कुटे, श्याम जोंधळे, भाऊसाहेब कमानकर, सुरेश खैरनार, अंबादास जामकर, सोमनाथ शिंदे, बाळू चारोस्कर, संजय दाते, खंडू बोडके, नरेंद्र डेर्ले, बाळासाहेब कानडे, साहेबराव डेर्ले, दत्तू भुसारे, ज्ञानेश्वर पोटे, शहाजी राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे यांसह नागरिक उपस्थित होते.