दमदार संततधारेने गोदामाईचा जलोत्सव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:14 AM2018-07-17T01:14:32+5:302018-07-17T01:14:57+5:30
जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितली. दुपारनंतर गोदावरीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली होती.
नाशिक : जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितली. दुपारनंतर गोदावरीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली होती. रात्री ८ वाजेपर्यंत नऊ हजार ३०२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुती पुरात बुडाला. शनिवारी पहाटेपासून शहरासह जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, गंगापूर धरणाचा जलसाठा या पंधरवड्यात ६० टक्क्यांनी वाढून सोमवारी संध्याकाळपर्यंत ७८ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग, शहरातील पावसाचे पाणी उपनद्या, नाल्यांमधून येणारे पाणी यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी प्रचंड वाढली होती. दुपारी २ वाजेपासून अग्निशामक दलाच्या जवानांकडून नदीकाठालगत सतर्क तेच्या सूचना दिल्या जात होता. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी लागले होते. देवमामलेदार मंदिरासह गंगा-गोदावरी प्राचीन मंदिर व नारोशंकर मंदिरातही पाणी शिरले होते. तसेच नीळकंठेश्वर महादेव मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला होता. गोरेराम मंदिराच्या खालील बाजूच्या आठ पायºया पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. दुपारी २ वाजता चार हजार ७१६ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.
नऊ हजार क्यूसेकचा विसर्ग
नदीचे सर्वच लहान पूल पाण्यामध्ये हरविले होते. नदीचा वाढता जलस्तर लक्षात घेता विक्रेत्यांनी तातडीने दुकाने हटवून घेतली. संध्याकाळी ६ वाजता दुतोंड्या मारुतीच्या मानेला पुराचे पाणी लागले. गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग सात हजार ६२ क्यूसेकवर पोहचला होता.रात्री ८ वाजता पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीपात्रात नऊ हजार ३०२ क्यूसेक इतके पाणी प्रवाहीत झाले होते. त्यामुळे दुतोंड्या मारूतीची मूर्ती पुराच्या पाण्यात बुडाली. मध्यरात्री पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास विसर्ग अधिक वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हंगामातील उच्चांक नोंद
शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असला तरी शहरात सोमवारी या हंगामातील पावसाची उच्चांकी नोंद करण्यात आली. दिवसभरात सकाळी साडेआठ वाजेपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत २२.१ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली. तसेच हवामान खात्याने २१ मि.मी. इतका पाऊस नोंदविला. रविवारी संध्याकाळपर्यंत १८.२ मि.मी. तर शनिवारी संध्याकाळपर्यंत २.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला होता; मात्र शनिवारी संध्याकाळनंतर जोर वाढल्याने रात्री आठ वाजेपर्यंत १४ मि.मी. पर्यंत पाऊस मोजला गेला.
‘अलर्ट’मुळे टळले नुकसान
सोमवारी दुपारपासून महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयासह पंचवटी उपकेंद्राच्या बंबाद्वारे जवानांकडून गोदाकाठावर नागरिकांना सतर्क केले जात होते. यामुळे विक्रेते वेळीच सावध झाले आणि त्यांनी दुकानांमधील माल हटविण्यास प्रारंभ केला होता. संध्याकाळपर्यंत रामकुंड येथील कपालेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, सांडव्यावरचे देवी मंदिर, अर्धनारी नटेश्वर मंदिराचा सर्व परिसर रिकामा झाला होता. रात्री उशिरा वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता शहरातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होेती.