गोदा पाय ठेवण्यायोग्य नाही, स्नान कसे करू?
By admin | Published: January 13, 2015 12:33 AM2015-01-13T00:33:50+5:302015-01-13T00:34:09+5:30
श्री श्री रविशंकर : ‘वेणुनाद’ कार्यक्रमात सवाल; आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक करणार स्वच्छता
नाशिक : प्रदूषणामुळे गोदावरी पाय ठेवण्यायोग्य राहिलेली नसताना, त्यात स्नान करण्याचा विचार कसा करू, असा सवाल आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित केला. आठ महिन्यांत मंगळावर पोहोचता येते, तर नद्यांची स्वच्छता होऊ शकत नाही का, असे विचारत त्यांनी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व नागरिकांना नद्यांची तातडीने स्वच्छ करण्याचे आवाहन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक या कार्यात पुढाकार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने पंचवटीतील साधुग्राम मैदानावर विश्वविक्रमी ‘वेणुनाद’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बासरीत कचरा असेल, तर ती नीट वाजत नाही. नाशकातील कुंभमेळा आठ महिन्यांवर आला असताना, गोदावरी, कपिला व नासर्डी या तिन्ही नद्या प्रचंड प्रदूषित झाल्या आहेत. नासर्डीचा तर अक्षरश: नालाच झाला आहे. शहर व जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन आपत्कालीन स्थितीच्या वेगाने या नद्यांची स्वच्छता मोहीम राबवावी. आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवकही यात पुढाकार घेतील. प्रशासनाने गोदावरीला मिळणारे सगळे नाले एकतर बंद करावेत किंवा पाइपच्या सहाय्याने ते अन्यत्र वळवावेत. या नद्या स्वच्छ झाल्या, तरच कुंभमेळ्यात साधू-महंत नदीत स्नान करू शकतील. लोकप्रतिनिधींनी तपश्चर्या समजून हे कार्य सिद्धीस न्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी जलस्वच्छतेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, जलस्रोत स्वच्छ झाल्यास माणसांचे आरोग्य चांगले राहते, विचारही स्वच्छ होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रसायनमुक्त शेती करा, प्लास्टिक जाळू नका, त्यातून कॅन्सरसारखे रोग उद्भवतात, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला आमदार तथा माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, आमदार पंकज भुजबळ, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)