देवी पावली; विनाशुल्क मिळणार दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 01:33 AM2021-10-06T01:33:40+5:302021-10-06T01:35:34+5:30
नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कालंका देवीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय कालंका देवी संस्थानने अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता विनाशुल्क दर्शन मिळणार आहे; मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे. नोंदणीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असून, दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षांवरील भाविकांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
नाशिक : नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कालंका देवीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय कालंका देवी संस्थानने अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता विनाशुल्क दर्शन मिळणार आहे; मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे. नोंदणीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असून, दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षांवरील भाविकांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
नाशिकचे ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या कालंका देवीच्या दर्शनासाठी ऑनलाइन पास घेताना शंभर रुपयांचे शुल्क आकारणीच्या निर्णयास सर्व स्तरांतून विरोध सुरू होता. त्यानंतर संस्थानने आता शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतला आहे; मात्र ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण असावे आणि कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी भाविकांना दर्शनासाठी येताना ऑनलाइन बुकिंग करूनच यावे लागणार आहे.
नोंदणी करताना संपूर्ण तपशीलाबरोबरच आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याचा पुरावा आदी बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाने देवी मंदिर परिसरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, तसेच कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रणासाठी कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेशाचा वापर करण्याचे अधिकार दिले आहेत. कालंका देवी यात्रोत्सव रद्द झाला असला तरी नवरात्रोत्सवाच्या काळात देवी मंदिरातील दैनंदिन नित्यपूजा, आरती व महाभिषेक होणार आहे.
नाशिककरांची कालंका देवी ग्रामदैवत असल्याने नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेत मंदिर प्रशासनाने नवरात्रोत्सवाच्या काळात २४ तास मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
---------
हार, फुलांना बंदी
दर्शनासाठी येताना कोणत्याही प्रकारचे हार, फुले, नारळ, हळदी, कुंकू, ओटीचे साहित्य सोबत आणू नये, तसेच ऑनलाइन नोंदणी नसणाऱ्या इतर भाविकांनी मंदिरासह परिसरात गर्दी करू नये, असे मंदिर प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
-------
तांत्रिक कारणांमुळे पेड दर्शनाचा निर्णय मागे घेतला आहे; मात्र दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन नोंदणी करावीच लागेल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेले असतील तरच नोंदणी होईल. शासन नियमाप्रमाणे दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना प्रवेश मिळणार नाही. भाविकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- आण्णा (केशव) पाटील, अध्यक्ष कालंका देवी संस्थान.