देवी मंदिर परिसर बनला कचऱ्याचे आगर
By admin | Published: October 16, 2016 02:04 AM2016-10-16T02:04:13+5:302016-10-16T02:04:37+5:30
घाणीचे साम्राज्य : छावणी परिषदेचे दुर्लक्ष
देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे देवी मंदिर परिसर कचरा व प्लॅस्टिकचे आगर बनला असून, छावणी प्रशासन व लोकप्रतिनिधींना स्वच्छता ठेवण्याच्या मागणीचा प्रशासनाला विसर पडला असून, तीन दिवसांनंतरही कचरा ‘जैसे थे’च आहे.
छावणी प्रशासन दरवर्षी जागा व्यावसायिकांना यात्रोत्सव काळात जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देते. यंदा नवरात्र उत्सवात ही जागा उपलब्ध करून दिली. मात्र तेथील व्यावसायिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यास प्रशासन असमर्थ ठरले. तेथे असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह हे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी काढल्याने स्वच्छ, सुंदर देवळालीतील देवी मंदिर मात्र यात्रा काळात अस्वच्छतेचे ठिकाण बनू लागले आहे.
नवरात्रोत्सव संपून तीन दिवस झाले तरी मोकळ्या जागेत प्लॅस्टिक पिशव्या, फुले, पत्रावळ्या, उरलेले अन्नाचे पदार्थ तसेच पडून असून छावणी प्रशासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. देवी मंदिर परिसरातदेखील नारळाच्या शेंड्या, बारवाच्या परिसराची स्वच्छता यासोबत देवी मंदिर बसथांब्याजवळदेखील मोठ्या प्रमाणावर कचरा तसाच पडून असल्याने ये-जा करणाऱ्या भाविकांच्या मनात परिसराविषयी अस्वच्छतेची भावना निर्माण होत आहे. (वार्ताहर)