निवडणूक खर्चात गोडसे, महाले आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:51 AM2019-06-25T01:51:31+5:302019-06-25T01:52:05+5:30
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले.
नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले. विशेष म्हणजे दिंडोरीमधून विजयी झालेल्या उमेदवाराचा खर्च प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षाही कमी आहे, तर नाशिकमधून अपक्ष उमेदवाराने विजयी उमेदवाराच्या जवळपास निवडणूक खर्च केल्याचे खर्चाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना ७० लाखांची मर्यादा आहे. त्यानुसार उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाचे आॅडिट होऊन अंतिम खर्चाची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी ६७ लाख ९० हजार ७०१ इतका खर्च केला, तर त्या खालोखाल अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा खर्च ५९ लाख ८९ हजार ५७१ इतका राहिला. राष्टÑवादीचे समीर भुजबळ यांनी ५६ लाख ४० हजार ५०० रुपये इतका खर्च केला. वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी १६ लाख ५४ हजार ४८४ इतका खर्च दाखविला आहे. अन्य उमेदवारांनीदेखील एक ते दीड लाखांपर्यंत खर्च केल्याची नोंद करण्यात आली आहे. या मतदारसंघातील सर्व १८ उमेदवारांचा एकूण निवडणूक खर्च हा २ कोटी ८ लाख ३४ हजार ११३ इतका झाला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याभराच्या आत निवडणुकीत केलेला खर्च सादर करावा लागतो त्यानुसार अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला आहे. नाशिक मतदारसंघातून सर्वाधिक १८ उमेदवारांनी निवडणूक लढविली.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आठ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघातून भाजपाच्या डॉ. भारती पवार या विजयी झाल्या आहेत. त्यांनी ४७ लाख ४९ हजार ४७८ इतका खर्च केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्टÑवादीचे धनराज महाले यांनी ५३ लाख ८३ हजार ८५२ इतका खर्च केला. खर्चाच्या बाबतीत ते मात्र पहिल्या क्रमांकावर राहिले. माकपाचे जिवा पांडू गावित यांनीदेखील ३१ लाख ३१ हजार ६६२ इतका खर्च केला आहे. बापू बर्डे आणि तुकाराम बागुल या उमेदवारांनीदेखील लाखोंच्या घरात खर्च केला.