सुवर्ण व्यवसायाला मिळतेय झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:03 PM2017-09-26T23:03:46+5:302017-09-27T00:31:07+5:30
मालेगाव शहराची सुवर्ण व्यावसायिकांची बाजारपेठ फुलू लागली असून नाशिक, जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी येथील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागासह कसमादे परिसरातून दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची वर्दळ वाढू लागली आहे.
बाजारात चैतन्य
संगमेश्वर : मालेगाव शहराची सुवर्ण व्यावसायिकांची बाजारपेठ फुलू लागली असून नाशिक, जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी येथील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागासह कसमादे परिसरातून दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची वर्दळ वाढू लागली आहे. दसरा-दिवाळीसाठी शहरातील सुवर्णबाजारात विविध प्रकारचे दागिने महिलावर्गाचे लक्ष आकर्षून घेत आहे. जुन्या गावात म्हणजे शहराच्या पूर्वेकडे बाजारपेठ स्थिरावली होती. तांबाकाटा, गूळबाजार, शिंपाटी, मामलेदार गल्ली, टिळकरोड, सरदार चौक, सांडवा पूल, सराफ बाजार आदी भागातच असणारा सुवर्ण व्यवसाय आता मोसमपूल ते सटाणानाका, कॅम्पपर्यंत बाजारपेठ व्यापून घेत आहे. शहराचा भौगोलिक विस्तार झाला. लोकसंख्या वाढली. संगमेश्वर, सावतानगर, कलेक्टरपट्टा, सटाणानाका, नववसाहत, कॅम्परोड आदी भागात हा विस्तार झाला. त्याबरोबर नवीन पिढीने कात टाकत या नवीन भागात नवीन इमारती उभारल्या. नवी विविध प्रकारची दुकाने, मॉल्स थाटली. याबरोबरच विविध उत्पादक कंपन्यांनी मालेगाव ही मोठी बाजारपेठ हेरून येथे नवनवीन शोरूम उभी केली. शिवाजी पुतळा, मोसमपूल, सटाणारस्ता, कॅम्प रस्ता, संगमेश्वरातील सावतानगर, मोतीबागनाका रस्ता, आग्रारोड आदी भागात शोरूम सुरू झाली. सोने दागिन्यांचे मोठे शोरूम सर्वांनाच आकर्षित करू लागले आहेत. शहराच्या पूर्व भागात सराफ बाजाराचा आता विस्तार झाला आहे. पश्चिम भागातही सराफाची दुकाने सुरू झाली आहेत. शहरातील सराफाबरोबरच नाशिक, जळगाव, पुणे आदी ठिकाणांच्या सुवर्णालंकाराच्या शाखा मालेगावात सुरू झाल्या आहेत. आकर्षक योजनांद्वारे ग्राहकांना आकर्षित करतात. यात व्यावसायिकांनी विविध कल्पनेद्वारे व्यवसाय वाढविला आहे. आगामी काळात नवनवीन उद्योगधंदे, कारखाने सुरू झाल्यास मालेगावची बाजारपेठ अधिकच बहरेल. मालेगाव जिल्हा निर्मितीकडे शहरवासीय डोळे लावून बसले आहेत. येथील व्यापारी उदीम वाढेल अशी आशा व्यावसायिक बाळगून आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरात जशा अत्याधुनिक सुविधा मिळतात तशा सुविधा आता मालेगावकरांना आम्ही देत आहोत. विविध फॅशनचे कपडे तेही तज्ज्ञांकडून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मालेगावच्या ग्राहकांना इतरत्र खरेदीसाठी जाण्याची गरज नाही. - शर्मिला अरविंद पवार, व्यावसायिक, मालेगाव
संपूर्ण देशात नोटाबंदी व जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर थंडावलेली बाजारपेठ आता बहरू लागली आहे. आगामी दसरा-दिवाळी सणात बाजारपेठ अधिकच गर्दी होऊन आर्थिक उलाढाल वाढेल अशी आशा आहे.
- सुदर्शन छल्लाणी, गृहउद्योजक, मालेगाव
आगामी जिल्हास्तरावरील गाव म्हणून मालेगावची ओळख आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही विस्तारित भागात नवीन शोरूम सुरू केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची सोय करू शकलो व व्यवसायातही वाढ झाली आहे.
- राजेश गोविंद दुसाने, सराफ मालेगाव