जागरूक युवकांमुळे सोनसाखळी चोर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:36+5:302021-03-30T04:11:36+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, चेहेडी पंपिंग येथील भगवा चौक साईआदेश अपार्टमेंटमधील रहिवासी अलका दिलीप ताजनपुरे या रात्री आठ वाजेच्या ...
याबाबत अधिक माहिती अशी, चेहेडी पंपिंग येथील भगवा चौक साईआदेश अपार्टमेंटमधील रहिवासी अलका दिलीप ताजनपुरे या रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची दळण दळण्याची गिरणी बंद करून घरी परतत होत्या. या वेळी दोन दुचाकींनी एकामागोमाग आलेल्या चोरट्यांच्या दोन जोड्यांपैकी एका जोडीने ताजनपुरे यांच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची साखळी हिसकावून पोबारा केला. तत्पूर्वी सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झालेल्या चोरट्यांनी घोडे वस्तीच्या दिशेने पलायन केल्याने ताजनपुरे यांनी जोरजोरात ‘चोर-चोर’ अशी आरोळी दिल्याने आजूबाजूच्या जागरूक युवकांनी तत्काळ दुचाकीने घोडे वस्तीच्या दिशेने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. या वेळी समोर नदीचे पात्र आल्याने आणि चोरट्यांना वाट न सापडल्याने चोरटे पुन्हा माघारी येण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्यांना युवकांनी घेरून रोखले. या वेळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याने काही वेळेतच पोलीसदेखील घोडे वस्तीमध्ये दाखल झाले. या दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कपिल कृष्णा जेथे (१९, रा. जेथे काॅलनी, संगमनेर), गणेश रामदास बन (२०, रा. इंदिरानगर, संगमनेर) अशी स्वत:ची ओळख सांगितली. त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच१५ डीझेड५८६५) पोलिसांनी जप्त केली आहे. ताजनपुरे यांच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची पट्टी चेन व पॅन्डल चोरून नाशिक-पुणे महामार्गाने दुचाकीवरून या चोरट्यांचे साथीदार राज सय्यद, रॉकी उर्फ विकी उर्फ ट्रिपल एक्स (दोघे रा. संगमनेर) हे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयित कपिल व गणेश यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.