देवळ्यात महिलेची सोन्याची चैन ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:35 PM2019-05-16T13:35:49+5:302019-05-16T13:36:09+5:30
खर्डे : गुंजाळनगर ता.देवळा येथील ताराबाई यशवंत कदम (६५) यांच्या गळ्यातील बारा ग्रॅमची सोन्याची पोत भर रस्त्यावरून एका दुचाकीस्वाराने ओरबाडून घेत पळ काढल्याने हे चोरीचे लोण ग्रामीण भागापर्यंत आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
खर्डे : गुंजाळनगर ता.देवळा येथील ताराबाई यशवंत कदम (६५) यांच्या गळ्यातील बारा ग्रॅमची सोन्याची पोत भर रस्त्यावरून एका दुचाकीस्वाराने ओरबाडून घेत पळ काढल्याने हे चोरीचे लोण ग्रामीण भागापर्यंत आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ताराबाई कदम या काल मंगळवार (१४) रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान रस्त्यावरून जात असतांना दुचाकीस्वाराने गुंजाळनगरच्या भर रस्त्यावर गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पळ काढला. कदम यांनी व नागरिकांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोर पसार झाला. या घटनेमुळे महिलावर्गात घबराटीचे वातावरण आहे. सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरणे धोकादायक असल्याने याबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. लग्नांमध्येही सोन्याचे दागिने जपून वापरले जावेत अन्यथा चोरांचे लक्ष तिकडेही वळू शकते. यापूर्वी ज्याच्या घरी लग्न त्याच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार गेल्या महिन्यात येथे झाला होता. तसेच रविवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. येथील आठवडे बाजार दर रविवारी भरतो. भाजीपाला खरेदी करण्याच्या नादात असलेल्यांचा व बाजारातील गर्दीचा हे चोरटे फायदा उठवतात व हातोहात मोबाईल पळवतात. पोलिसांनी या चोरांचा छडा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.