नृत्यतपस्येचा सुवर्ण महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 09:06 IST2025-02-23T09:06:21+5:302025-02-23T09:06:30+5:30
नाशिकमधील कीर्ती कला मंदिरचे २३ फेब्रुवारीपासून सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने एक विशेष कार्यक्रम गुरुदक्षिणा सभागृहात होत आहे. या प्रवासाचा यानिमित्ताने हा धावता आढावा.

नृत्यतपस्येचा सुवर्ण महोत्सव
वंदना अत्रे
ज्येष्ठ पत्रकार, संगीत-कला समीक्षक
खाद्या विशिष्ट शिक्षणाचा मुलीने हट्ट धरावा असे ते अजिबात दिवस नव्हते. आणि शिक्षणासाठी आपले गाव सोडून थेट मुंबई, पुण्याला जाणाऱ्या धीट (त्या काळात आगाऊ!) मुली नाशकात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यासुद्धा नसतील. पण, आसपासचे वास्तव जणू दिसतच नसावे अशा आत्मविश्वासाने ती थेट मुंबईला, तेव्हाचे सेलिब्रिटी दर्जाचे, गुरू गोपीकृष्णजी यांच्याकडे कथ्थक शिकायला गेली. सहा वर्षे मुंबईत ठाणे-खार असा प्रवास करीत नृत्यात प्रवीण झाली आणि मग, “खूप नाच करायला मिळावा” यासाठी नाशिकसारख्या कर्मठ शहरात नृत्य शिकवणारा क्लास सुरू केला. नाशिकमधील तो क्लास, कीर्ती कला मंदिर, यंदा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. सत्तरीच्या दशकात क्लास सुरू करण्यासाठी ज्या उत्साहाने त्या क्लासची गुरू कामाला भिडली होती, त्याच तरुण उत्साहाने आजही ती, रेखा नाडगौडा, सुवर्ण महोत्सवाच्या तयारीला लागली आहे. नाशिकमधील कित्येक कुटुंबांना नृत्याचा लळा लावणाऱ्या आणि नृत्य शिकणाऱ्या मुलींसोबत कीर्ती कला मंदिरच्या परिवारात सामावून घेणाऱ्या रेखाताई यांच्या किमान २५ मुली आज नृत्य गुरू म्हणून देश परदेशात काम करीत आहेत. “पायात चाळ बांधून काय करणार ही मुलगी?” असा अव्वल खवचट प्रश्न विचारणाऱ्या या शहराने आज त्यांचे कर्तृत्व मनोमन मान्य केले आहे.
मुलींना नृत्य शिकवणे हे रेखाताईंचे प्राथमिक उद्दिष्ट नक्की होते; पण या निमित्ताने संस्कृतीच्या विविध पैलूंची मुलींना ओळख करून देण्याचाही त्यांचा हेतू होता. केवळ नृत्यातील बंदिशी, बोल, पढंत म्हणजे कथ्थक नाही हे बोलण्यापेक्षा त्यांनी कृतीतून मुलींना सांगितले. त्यासाठी तात्यासाहेबांच्या कवितांवर नृत्य बसवले, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गायनासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदिशी नृत्यातून मांडल्या, महाराष्ट्राचे मराठीपण नृत्यातून दाखवले आणि भारतीय संस्कृतीचे वेगळेपण मिरवणारी नवविधा भक्तीसुद्धा रसिकांच्या पुढे मांडली. ७६ साली डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते कीर्ती कला मंदिराचे उद्घाटन झाले. अशा प्रकारच्या उपक्रमांचे त्यावेळी या गावाला अप्रूप होते. त्यामुळे नाशिक एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या सारडा मंदिरचे सभागृह क्लास घेण्यासाठी सहज उपलब्ध करून दिले आणि क्लास सुरू झाला. रेखाताईंनी या निमित्ताने जो आप्तपरिवार जमा केला त्यापैकी तिघीजणी, राधिका राजपाठक आणि कुमुदताई-कमलताई ही अभ्यंकर जोडगोळी, जणू त्यांच्या बरोबरीने या क्लासच्या अघोषित संचालिका झाल्या.
राजपाठकबाई संहिता लिहायच्या आणि कुमुदताई-कमलताई नृत्यनाट्य बसवण्यासाठी लागणारी मदत करण्यासाठी त्यांच्या मागे उभ्या असायच्या. गोपीकृष्णजी यांच्या अकस्मात निधनानंतर आपल्या गुरूंच्या स्मृत्यर्थ रेखाताईंनी ९४ सालापासून पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव सुरू केला, जो आजही सुरू आहे. त्या निमित्ताने पंडित बिरजू महाराजांपासून राजेंद्र गंगाणीपर्यंत अनेक नृत्य कलाकार, विविध शैलींचे गुरू आणि त्यांचे प्रयोग त्यांनी नाशिकच्या रसिकांच्या समोर आणले. नृत्याच्या माध्यमातून बदलत्या काळाशी जोडून घेण्याचे व या काळाचे प्रश्न मांडण्याचे रेखाताईंचे प्रयत्न दाद देण्याजोगे असतात.
आज रेखाताईंच्या दोघी मुली, लंडन निवासी अश्विनी काळसेकर आणि अदिती पानसे त्यांच्या आईची परंपरा तितक्याच दमदारपणे पुढे नेत आहेत. सुवर्ण महोत्सवानिमित वर्षभर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम/उपक्रम रेखाताईंनी आखले आहेतच.
नृत्य संगीताच्या सहवासात जगणाऱ्या माणसांचे वय वाढत नाही असे म्हणतात, रेखाताई हे त्या समजुतीचे साक्षात उदाहरण आहे! कीर्ती कला मंदिरची शताब्दी पण ती तेवढ्याच उत्साहाने साजरी करेल...!