पत्रिका वाटप टाळून केला लग्नाचा सुवर्ण महोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:17 AM2018-05-24T00:17:52+5:302018-05-24T00:17:52+5:30
लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक्ष्मण बर्वे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न वाटता आप्तस्वकीयांना सोशल मीडियावरूनच कळविण्यात आले तसेच पत्रिका वाटप टाळा असे आवाहन करण्यात आले.
नाशिक : लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक्ष्मण बर्वे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न वाटता आप्तस्वकीयांना सोशल मीडियावरूनच कळविण्यात आले तसेच पत्रिका वाटप टाळा असे आवाहन करण्यात आले. आणि त्यानुसार सोहळाही पार पडला. लग्नपत्रिका वाटताना अनेकदा अपघात घडण्याचे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी पत्रिका वाटप करण्यापेक्षा अलीकडे सोशल मीडियासारखे माध्यम वाढत असताना त्याचा वापर करून घेतला पाहिजे. पत्रिका न छापणे म्हणजे वृक्षतोड टाळण्यासारखे असून, हे पर्यावरणस्नेहीदेखील आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात समाज जागृतीची भूमिका बजावत सात दिवस मालिकेतून प्रबोधनदेखील केले होते. त्यातून प्रेरणा घेऊन अशोक व वसुंधरा देशमुख यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस त्यानिमित्ताने पुन्हा एकदा विवाह सोहळा करण्याचे नियोजन करण्यात आले. रवींद्रनाथ विद्यालयातील शिक्षिका अनुराधा देशमुख-बर्वे व तसेच बीएसएनएलमधील उपमंडल अभियंता प्रसाद बर्वे यांच्या पुढाकाराने पत्रिका टाळून सर्व मित्रपरिवाराला व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडियावरून निमंत्रणे पाठविण्यात आली आणि त्यानुसार कार्यक्रम झाला. या सोहळ्यास उपस्थित नागरिकांना देशमुख बर्वे परिवाराच्या वतीने वृक्षलागवड, मुलींचे शिक्षण या विषयावर प्रबोधनाची घोषवाक्ये असलेल्या अडीचशे कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या.