सोनेरी ते पाथरे रस्ता मे मध्ये होणार खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:18 PM2021-02-08T19:18:00+5:302021-02-09T00:47:55+5:30

नांदूरशिंगोटे : समृद्धी महामार्गाच्या टप्प्यातील सोनेरी ते पाथरे या ४५ किलोमीटर अंतराच्या सहापदरी रस्त्याचे काम ६५ ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून सदर रस्ता मे महिन्यात खुला होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी पालकमंत्री भुजबळ यांना आढावा बैठकीत सांगितले. त्यानंतर भुजबळ यांनी महामार्गावरील रस्ता कामाची पाहणी करून कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

The Golden to Stone Road will be open in May | सोनेरी ते पाथरे रस्ता मे मध्ये होणार खुला

सोनेरी ते पाथरे रस्ता मे मध्ये होणार खुला

Next
ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : पालकमंत्र्यांनी घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा

नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व सिन्नर-शिर्डी चौपदरी रस्ता कामाचा आढावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथे सोमवारी (दि. ८) दुपारी घेतला. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी भुजबळ यांनी कामाबाबत समाधान व्यक्त करीत समृद्धी महामार्गाचे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात पॅकेज १२ मध्ये असलेल्या दिलीप बिल्डकॉन येथे झालेल्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. बी. गायकवाड, अधीक्षक अभियंता आर.पी. निघोट, कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, कार्यकारी अभियंता डी. के. देसाई, अभियंता एन. के.बोरसे, पी.व्ही. सोयगावकर, एनएचएआयचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, पल्लवी गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे, कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनीष मिश्रा, जनसंपर्क अधिकारी सुनील तोमर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कंपनीच्या वतीने प्रोजेक्टरद्वारे सविस्तर सादरीकरण पालकमंत्री भुजबळ यांच्या समोर करण्यात आले. यामध्ये पॅकेज १२ प्रकल्प, ४५ किलोमीटर रस्त्यात १२ किलोमीटर सर्व्हिस रोड आहेत. छोटे-मोठे पूल, आगामी नियोजन, वृक्ष लागवड, मनुष्यबळ निर्मिती, कामाची सद्यपरिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले. या रस्त्यासाठी जिल्ह्यातील १० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन संपादित केली असून जवळपास बाराशे कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात कामे अधिक वेगाने होणार असून मे २०२१ पर्यंत रस्ता सुरू होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी भुजबळांना सांगितले.
रस्त्यांची डागडुजी कंपनीने करावी
सिन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांंची कामे होत असले तरी गौण खनिज वाहताना तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचे आमदार कोकाटे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत असल्याने शेतकरी वर्गांची मोठी अडचण झाली असून याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने याबाबत तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. नागपूर-मुंबई हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, रस्ते विकास यांनी एकत्रितपणे पाहणी करून रस्ते दुरुस्तीसाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

Web Title: The Golden to Stone Road will be open in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.