सव्वा कोटीचा शर्ट घालणारा गोल्डमॅन अटकेत, २२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 08:10 PM2023-02-03T20:10:39+5:302023-02-03T20:14:12+5:30
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फ्लॅटमधून पारख यांना अटक केली.
नाशिक - जिल्ह्यातील येवला येथील एक गोल्डमॅन काही वर्षांपूर्वीच चांगलेच चर्चेत आले होते. पंकज पारख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून पुण्यातील फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेकच केले नव्हते तर गिनीज बुकातही स्वतःच्या नावाची नोंद केली. त्यामुळे, तब्बल सव्वा कोटींचा शर्ट परिधान करणारा हा गोल्डमॅन चांगलाच चर्चेत होता. आता, पंकज पारख यांना एका घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. पंकज पारिख संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फ्लॅटमधून पारख यांना अटक केली. पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी केला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन गेले असून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कोण आहेत पंकज पारिख
नाशिकच्या येवला भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व उपमहापौर असलेले पारिख व्यावसायिक आहेत. त्यांनी १० किलो वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला आहे व जगातील सर्वाधिक महागडा शर्ट अशी नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे. पारिख हा शर्ट घालतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी सहा बॉडीगार्ड असतात. या शर्टचे डिझाईन त्यांनी दुबईतून बनवून घेतले व नाशिकच्या बाफना सराफांनी तो बनविला. त्यासाठी १९ कारागिर दोन महिने काम करत होते. या शर्टबरोबरच पारिख सोन्याच्या भल्या जाडजूड चेन्स, सोन्याचे घड्याळ, सोन्याची चष्मा फ्रेम, सोन्याचे मोबाईल कव्हर अशा अॅक्सेसरीजही वापरतात.