चांगल्या स्मृतींनी जीवनात आनंद फुलतो : ब्रह्मकुमार रूपेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:44 AM2019-05-30T00:44:00+5:302019-05-30T00:44:29+5:30
जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
नाशिक : जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. चांगल्या स्मृती नेहमीच आनंद देतात, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार रूपेश यांनी केले.
गोदाकाठावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे २९वे पुष्प नाशिक वसंत व्याख्यानमालेत अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यानात ‘खुशनुमा जिंदगी’ या विषयावर रूपेश बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवनात दु:ख, कटू प्रसंग यावे, असे कोणालाही वाटत नाही; मात्र जीवनाचा तोदेखील एक भाग आहे. त्यामुळे आलेल्य कटू प्रसंगांना तसेच दु:खदायक घटनांना मानवाला वेळोवेळी सामोरे जावे लागतेच. मात्र त्या घटना मानवाने विसरणे गरजेचे असते, परंतु मनुष्याचे नेमके याविरुद्ध घडते. तो जीवनात घडणाऱ्या आनंदी बाबी, प्रसंग विसरून जातो आणि दु:खदायक वेदनादायी प्रसंगांना कवटाळून बसतो. त्यामुळे त्याचे जीवन निराशावादी बनत जाते. त्यानंतर ब्रह्मकुमारी गीतादीदी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले, भारतात जन्म घेणारे पुण्यात्मा आहेत. भारतभूमी अतुलनीय आहे. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा नियंत्रणात ठेवल्या तर जीवनात अधिकाधिक आनंद प्राप्त होतो. कमाई करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. दानशूर वृत्तीचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जो जसा वागतो, तसेच त्याला फळ जीवनात मिळत असते, हे विसरून चालणार नाही. क्षमा हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. माणसाने क्षमाशील होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.