सौभाग्यवतींनो, उद्याच करा वटपूजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:10 AM2019-06-15T01:10:50+5:302019-06-15T01:11:12+5:30
यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक : यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
दाते पंचांगचे मोहनराव दाते यांनी याबाबत म्हटले आहे, यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु.१४ ला म्हणजे रविवारी (दि.१६) आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अदिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. दि. १६ जून रोजी रविवारी ज्येष्ठ शु.१४ दुपारी २ वाजून २ मिनिटांपर्यंत असून याच दिवशी पौर्णिमा तिथी सायान्हकाळी ६ घटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे १६ जून रोजीच सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी २ वाजून २ मिनिटांपर्यंत चतुर्दशी तिथी असली तरी त्याच दिवशी सूर्यादयापासून मध्यान्हापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु.१४ ला रविवारी (दि.१६) नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे. यापूर्वी शक १९३२, १९३८, १९३९ ला अशीच परिस्थिती उद्भवल्याने पंचांगकर्त्यांनी आपला निर्णय दिल्याचे मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे.