भल्या पहाटे ‘खाकी’ महिलेच्या मदतीला धावली देवदूतासारखी अन्....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:12 PM2021-01-04T21:12:35+5:302021-01-04T21:19:45+5:30
नाशिक : वेळ : पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृध्द दाम्पत्य गर्भवती महिलेला धरुन पायी चालत असल्याचे नजरेस ...
नाशिक : वेळ : पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृध्द दाम्पत्य गर्भवती महिलेला धरुन पायी चालत असल्याचे नजरेस पडते...पोलिसांच्या वाहनाचा दिवा चमकलेला बघताच ते जागीच थबकतात...रात्र गस्तीचे पोलीस वाहन थांबते अन् कर्मचारी खाली उतरतात... तर बघतात की गर्भवती स्त्रीला प्रसूती कळा सुरु झाल्या आहेत. तत्काळ ते वाहनातून बिनतारी संदेश नियंत्रण कक्षाला देतात आणि परवानगी घेत त्वरित त्या वृध्द दाम्पत्यासह गर्भवती महिलेला वाहनात बसवून सायरन वाजवित गंगापूर गावातून गिरणारे ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहचवून महिलेला मोठा दिलासा दिला.
सोमवारी पहाटेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे पीटर मोबाइल नेहमीप्रमाणे रात्रगस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास एक वृध्द दाम्पत्य एका गर्भवती महिलेसोबत पायी जात असल्याचे गस्तीपथकाच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ सहायक पोलीस निरिक्षक नितीन पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्राद्वारे माहिती दिली. तसेच अतिरिक्त मदत म्हणून गुन्हे शोध पथकाच्या वाहनालाही तत्काळ पाचारण केले. पोलीस नाइक गिरिश महाले, राहुल सोळसे यांच्या मदतीने त्वरित गुन्हे शोध पथकाच्या वाहनात गर्भवती महिला भारती जाधव (२३) आणि त्यांचे सासु-सासरे यांना तत्काळ वाहनचालक दत्तात्रय उगले यांनी गिरणारे रुग्णालयात अगदी कमी वेळेत दाखल केले. वेळेवर गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहचविल्यामुळे प्रसुती कळांपासून होणाऱ्या वेदनांपासून जाधव यांना मोठा आधार मिळाला. पहाटेची वेळ असल्यामुळे कुठल्याहीप्रकारचे वाहन गंगापूर गावापासून उपलब्ध होत नसल्याने ते वृध्द सासु-सासरे हे आपल्या सुनेला पायीच घेऊन रस्त्यावर आले होते आणि योगायोग असा की रात्रीच्या गस्तीपथकाचे याकडे लक्ष वेधले गेले आणि एखाद्या देवदूताप्रमाणेच त्यांनी या महिलेच्या मदतीला धावून जात मानवी संवदेना पोलीस दलात जागृत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. गिरणारे ग्रामीण रुग्णालयात जाधव यांची यशस्वीरित्या प्रसुती झाली. त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला.