GOOD NEWS: कामगाराच्या मुलाला फेसबुककडून 10 हजार डॉलरचे बक्षीस
By admin | Published: May 15, 2017 04:49 PM2017-05-15T16:49:36+5:302017-05-15T16:49:36+5:30
कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे
Next
ऑनलाइन लोकमत/ रामदास शिंदे
पेठ (नाशिक), दि. 15 –कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे सध्या जगभर गाजत असून कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा जयेशला फेसबुकने तब्बल 10 हजार डॉलरचे बक्षीस प्रदान केले आहे.
फेसबुक सह इतर सर्वच सोशल मीडिया साइटमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात. यामुळे वापर करणाऱ्या खातेदारांचा डाटा असुरक्षित होऊ शकतो. अशाच प्रकारची फेसबुकमध्ये त्रुटी राहुन गेल्याचे नाशिकच्या व सध्या पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जयेश बापू आहिरे या विद्यार्थाने शोधून काढली.
एखाद्याने फेसबुकवर अपलोड केलेला एखादा फोटो वापर करणाऱ्याची परवानगी न घेता दुसऱ्याला बदलता किंवा काढून टाकता येऊ शकत होता. अशा प्रकारची त्रुटी शोधून काढल्यानंतर जयेशने ईमेलद्वारे फेसबुकला ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रारंभी जयेशचे म्हणणे फारसे कंपनीने मनावर न घेतल्याने त्याने फेसबुकच्या टेस्टिंग प्रोफाईलमध्ये बदल करून त्याचा सविस्तर छायाचित्रण कंपनीला सादर केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या फेसबुकने जयेशशी संपर्क साधून सदर त्रुटीबाबत आधिक माहिती जाणून घेतली.
कंपनीला खात्री पटल्यानंतर जयेशला तब्बल 10 हजार डॉलर म्हणजेच 6 लक्ष 50 हजाराचे बक्षीस दिले. जयेशचे वडील बापू सुकदेव अहिरे हे नाशिकच्या एका खासगी कंपनीत कामगार असून आई विद्या शिवणकाम करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावतात. जयेश सद्या सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जयशने आपले शिक्षण घेतले असून अतिशय कमी वयात मिळालेल्या या बक्षिसाचे श्रेय तो आपल्या आई - वडिलांना देतो.
तेव्हा फेसबुकला विश्वास झाला - जयेश
मी कायमच आपल्या दैनंदिन वापरातल्या साइट्स जशा गुगल किवा फेसबुकविषयी खूपच जिज्ञासू राहिलोय. या साइट्समध्ये कुठे न कुठे बग असतोच म्हणून मी नेहमी त्या टेस्ट करत असतो.
मी एका रात्री पूर्ण टेस्टिंग करून त्यांना बग रिपोर्ट केला पण त्यांनी माझं ऐकलंच नाही आणि ते सरळ म्हणाले की, असं काही असूच शकत नाही. पण जेव्हा मी त्यांना टेस्टिंग अकाउंटवरील त्यांची पोस्ट बदलून आणि या संपूर्ण अकार्यक्षमतेचा व्हिडीओ पाठवला तेव्हा त्यांना विश्वास पटला. दरम्यान, मी स्वतः तो बग फिक्स करून दिला जेणेकरून युजर्संना त्रास होणार नाही.
काही तासात सर्व समस्या सुटल्यानंतर मला त्यांचा ईमेल आला आणि बग शोधल्याबाबत त्यांनी मला तब्बल 10 हजार डॉलर्स देऊ केले.
"जयेश लहानपणापासूनच हुशार"
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोजगाराच्या शोधात गाव सोडून नाशिक गाठले. मिळेल ते कामे करत असताना एका कंपनीत नोकरी करून मुलांचे शिक्षण सुरू केले. जयेश लहानपणापासूनच हुशार असल्याने त्याला लागेल ती मदत पुरवण्याचा थोडाफार प्रयत्न केला मात्र जयेशने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेल्या बक्षिसामुळे आम्हास त्याचा अभिमान वाटतो.- बापू आहिरे, जयेशचे वडील