नाशिककरांसाठी गुड न्यूज; सोमवारी मान्सून देणार जिल्ह्यात सलामी!
By अझहर शेख | Published: June 22, 2023 05:06 PM2023-06-22T17:06:08+5:302023-06-22T17:06:23+5:30
बिपरजॉय चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वारे कमकुवत केल्यामुळे पाऊस लांबला आहे.
नाशिक : वरुणराजाच्या कृपादृष्टीसाठी सारेच जण प्रार्थना करत असून बळीराजाही पेरणीची तयारी करून सज्ज झाला आहे. वरुणराजा बरसताचा बळीराजा आपल्या सर्जा-राजाच्या साथीने पेरता होणार आहे. येत्या सोमवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. घाटप्रदेशातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वारे कमकुवत केल्यामुळे पाऊस लांबला आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार का अशी चिंता जिल्हा प्रशासनालाही सतावू लागली आहे.हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार येत्या सोमवारी जिल्ह्यातील घाटप्रदेशातील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. या भागासाठी ‘यलो अलर्ट’ दिला गेला आहे. तसेच रविवारीसुद्धा नाशिकमध्ये पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव होऊ शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सध्या १ हजार ७८२ दलघफू अर्थात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच गंगापूर धरण समूहातसुद्धा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र हा पाणीसाठा ऑगस्टच्या मध्यान्हपर्यंतच पुरणारा आहे. यामुळे तोपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्यास मोठा दिलासा नाशिककरांना मिळणार आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, नगरपालिकांचे अधिकारी, कृषी विभागाचे व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना दिले आहेत.