गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठेत सशुल्क प्रवेशाला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:15 AM2021-03-31T04:15:12+5:302021-03-31T04:15:12+5:30
काही ठिकाणी गर्दी आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असला तरी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी राबविलेल्या योजनेला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या ...
काही ठिकाणी गर्दी आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असला तरी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी राबविलेल्या योजनेला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे बाजारपेठेत सशुल्क प्रवेश राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात तर पंधरा हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले असले तरी बाजारपेठेत गर्दी कमी होत नाही. त्यातही आरोग्य नियमांचे पालन होत नसल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही योजना राबवली आहे. त्यानुसार मेनरोड, सिडको, इंदिरानगर तसेच पंचवटीतील बाजार समिती अशा सर्व ठिकाणी बॅरिकेडिंग करून बंदिस्त करण्यात आले आहे. तसेच बाजारात जाण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाच रुपये शुल्क आकारण्यात येत असून, एक तासाच्या वर कालावधी लागला तर संबंधितांना पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला मंगळवारपा (दि. ३०)पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले तसेच मेनरोड भागात दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पास घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शुल्क भरून बाजारात जाणाऱ्यांची देखील गर्दी झाली होती. मेनरोड भागात जाण्यासाठी अनेक एन्ट्री आणि एक्झीट पॉइंट असून, पहिल्या दिवशी महापालिकेची यंत्रणा कमी पडल्याने दुपारी तर धुमाळ चौक परिसरातून विनाशुल्क आणि पावतीसह नागरिक जात होते. सिडको, इंदिरानगर भागात तर सकाळी नेहमची गर्दी नव्हती आणि शुकशुकाट होता.
गर्दी टाळण्यासाठी हा पहिला प्रयोग असला तरी शहराचे आरोग्य हित लक्षात घेऊन हा प्रयोग राबवला जात आहे. त्यासाठी व्यापारी वर्गाचे देखील सहकार्य आहे. शहरात हा प्रयोग किमान १५ एप्रिलपर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार असून, लवकरच नाशिकरोड येथेही प्रमुख बाजारात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो...
आता ऑनलाइन प्रवेश पावती मिळणार
बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी राबवलेल्या प्रयोगात पहिल्याच दिवशी शुल्क भरून पावती घेण्यासाठीच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे महापालिकेने ऑनलाइन पाच रुपये भरून प्रवेश पावती देण्याची सोय करण्याचे ठरवले आहे. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील ॲप तयार करण्यात येणार असून, नागरिकांना घरबसल्या पाच रुपये शुल्क भरून पावती मिळेल तसेच त्याला टाइम स्लॉट देखील निवडण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. गेल्या वर्षी महापालिकेने मिशन विघ्नहर्ता अंतर्गत अशाच प्रकारे गणेश विसर्जनासाठी ॲप तयार केले होते. त्याच धर्तीवर हे ॲप असेल, असे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो...
इंदिरानगर येथील कृष्णकांत भाजी मार्केट आणि सिडकोतील पवननगर भाजी मार्केट येथे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. इंदिरानगरात तर नागरिकांनी रांगा लावून प्रवेश शुल्क भरले तर सिडकोत देखील प्रवेश शुल्क भरण्यास प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे पावती भरण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली.