अलविदा-२०२०- बिबट्याची दहशत; अन‌् अर्धा डझन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:02+5:302020-12-31T04:15:02+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शहराजवळच्या खेड्यांमध्ये दारणा खोऱ्यात बिबट्याने चालू वर्षी एप्रिलपासून जुलैपर्यंत धुमाकूळ घातला. तीन बालकांसह एका वृध्दाला ...

Goodbye-2020 - Leopard terror; Another half a dozen victims | अलविदा-२०२०- बिबट्याची दहशत; अन‌् अर्धा डझन बळी

अलविदा-२०२०- बिबट्याची दहशत; अन‌् अर्धा डझन बळी

Next

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शहराजवळच्या खेड्यांमध्ये दारणा खोऱ्यात बिबट्याने चालू वर्षी एप्रिलपासून जुलैपर्यंत धुमाकूळ घातला. तीन बालकांसह एका वृध्दाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. वनविभागाने या परिसरातून सुमारे डझनभर बिबटे युध्दपातळीवर प्रयत्न करून जेरबंद केले होते. नोव्हेंबर महिन्यात इगतपुरी वनपरिक्षेत्रात आक्रमक झालेल्या बिबट्याने दोन बालिकांचा बळी घेतला होता.

---

नांदूरमधमेश्वरला मिळाला जागतिक स्तरावरील ‘रामसर’ दर्जा

निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याला २५ जानेवारी रोजी स्वित्झर्लंडच्या रामसर संस्थेच्या सचिवालयाने जागतिक स्तरावरील ‘रामसर पाणस्थळ’ असा दर्जा दिला. रामसर दर्जा मिळालेले हे महाराष्ट्रातील पहिले पाणस्थळ ठरले.

---

नाशिकच्या वनाच्छादनात घट

नाशिक जिल्ह्यातील वनाच्छादनाचे प्रमाण घटल्याचे वन सर्वेक्षण अहवालातून पुढे आले. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या (एफएसआय) अहवालात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत मागील दोन वर्षांत दीड ते दोन टक्क्यांनी वनाच्छादित प्रदेश कमी झाल्याची नोंद करण्यात आली. हा अहवाल मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आला होता.

---

लॉकडाऊन काळात नाशिकची ‘हवा’ सुधारली

लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा पर्यावरण संवर्धनाला झाला. शहरातील वायुप्रदुषण घटल्याने ‘हवा’ सुधारली, तसेच गोदेचे जलप्रदूषणही आटोक्यात आले. वाहनांचा गोंगाट थांबल्याने ध्वनिप्रदूषणाची पातळीही घसरण्याच मदत झाली. निसर्ग या काळात चांगलाच बहरला.

---

राजसारथी सोसायटीत बिबट्यांचा दोघांवर हल्ला

इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीमध्ये ३० मे रोजी भल्या पहाटे बिबट्या शिरल्याने रहिवाशांचा थरकाप उडाला. बिबट्याने यावेळी दोन रहिवाशांना पंजा मारून जखमी केले होते. हा बिबट्या अखेरपर्यंत पिंजऱ्यात आला नाही.

---

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा प्रभाव

मुंबईच्या अरबी समुद्रात जून महिन्यात धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा नाशिकलाही जाणवला. नाशकात ताशी ४० किमी इतक्या वेगाने वारे वाहू लागले होते. पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वृक्षही विविध ठिकाणी उन्मळून पडले होते.

---

नांदुरमधमेश्वरला फुलली सहस्त्र कमळपुष्पे

नांदुरमधमेश्वरमध्ये जुलै महिन्यात मोठ्या संख्येने दीड एकराच्या बेटावर जलाशयात शेकडो कमळपुष्पे फुलली होती. या कमळपुष्पांमुळे जलाशयाची शोभा अधिकच वाढल्याचे दिसून आले होते. पर्यटकांचा वावर बंद राहिल्याने जास्त कालावधीपर्यंत कमळपुष्पे बघावयास मिळाली होती.

----

जिल्हास्तरावर चिमणपाडा गाव आले प्रथम

संत तुकाराम वनग्राम योजनेत दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा गावाने प्रथम क्रमांक पटकाविला. या गावातील आदिवासींनी वनवणवे, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी यशस्वी करत वनसंवर्धनात मोठे योगदान दिले.

---

नाशिक वनवृत्ताला मिळाले मुख्य वनसंरक्षक

२०१९ सालात सुमारे दहा महिने नाशिक वनवृत्ताला मुख्य वनसंरक्षकांची प्रतीक्षा करावी लागली. ही प्रतीक्षा चालू वर्षी ऑगस्टमध्ये संपली. १० ऑगस्ट रोजी राज्य शासनाकडून भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि नाशिक वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकपदी नितीन गुदगे यांची नियुक्ती करण्यात आली.

---

दारणा खोऱ्यात वनविभागाने दिले १ कोटीचे अर्थसाहाय्य

दारणाच्या खोऱ्यातील हिंगणवेढे, दोनवाडे, बाभळेश्वर, सामनगाव, चेहेडी, पळसे या गावांमध्ये लॉकडाऊन काळात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या वारसदारांसह गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तींना शासननिर्णयानुसार अर्थसाहाय्य करत, सुमारे १ कोटींचा निधी वितरित केला.

Web Title: Goodbye-2020 - Leopard terror; Another half a dozen victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.