हरविलेल्या बालिकेचा ‘गुगल’ने घेतला शाेध; लैंगिक अत्याचाराचा झाला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:35 AM2022-02-14T01:35:13+5:302022-02-14T01:35:44+5:30
जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका जेमतेम दहा वर्षांच्या चिमुकलीवर शनिवारी (दि. १२) रात्री अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अंधाराचा फायदा घेत एका संशयित तरुणाने तिला ‘मी तुझ्या पप्पांचा फ्रेंड आहे, तुला पप्पाजवळ सोडतो’ असे सांगून एका अपार्टमेंटमध्ये घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब रविवारी (दि. १३) संध्याकाळी उघडकीस आली. या बेपत्ता मुलीचा माग बॉम्ब-शोधक नाशक पथकातील ‘गुगल’ श्वानाने काढला. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत ती अत्याचाराला बळी पडलेली होती.
नाशिक : जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका जेमतेम दहा वर्षांच्या चिमुकलीवर शनिवारी (दि. १२) रात्री अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अंधाराचा फायदा घेत एका संशयित तरुणाने तिला ‘मी तुझ्या पप्पांचा फ्रेंड आहे, तुला पप्पाजवळ सोडतो’ असे सांगून एका अपार्टमेंटमध्ये घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब रविवारी (दि. १३) संध्याकाळी उघडकीस आली. या बेपत्ता मुलीचा माग बॉम्ब-शोधक नाशक पथकातील ‘गुगल’ श्वानाने काढला. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत ती अत्याचाराला बळी पडलेली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित चिमुकली शनिवारी रात्री जेलरोड येथील तिच्या राहत्या घरातून वडिलांसोबत फिरण्यासाठी गेली होती. वडील श्वानाला एका गार्डनमध्ये फिरवीत असताना चिमुकलीने पुन्हा तेथून घराच्या दिशेने पळ काढला. यामुळे वडिलांना वाटले की मुलगी घराकडे गेली. मात्र, वाटेतच संशयिताने तिला फूस लावून वडिलांजवळ सोडण्याचे आमीष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. वडील जेव्हा पाळीव श्वानाला घरी घेऊन आले, तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारणा केली असता पत्नीने ती घरी आली नसल्याचे सांगितले. यानंतर या दाम्पत्याने मुलीचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. ती यावेळी घाबरलेली असल्याने तिने कोणाला काहीही सांगितले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी चेतन डोळस (वय २५) यास बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे.
--इन्फो--
रहिवासीही बालिकेच्या शोधार्थ
आजूबाजूचे लोकदेखील बालिकेच्या शोधासाठी धावले. रात्रीच्या काळोखात सर्वत्र चिमुकलीचा शाेध सुरू झाला. याबाबत तत्काळ पोलिसांना रहिवाशांनी माहिती कळविली. नाशिकरोड, उपनगर पोलिसांची गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती व बेपत्ता मुलीचे वर्णन कळविण्यात आले. रात्री उशिरा चिमुकलीचा शोध घेण्यात पोलिसांना श्वानाच्या मदतीने यश आले.
--इन्फो--
...अन् ‘गुगल’ धावत सुटला
पोलिसांनी उशिरापर्यंत बेपत्ता बालिकेचा शोध घेतला. मात्र, ती आढळून न आल्याने गांभीर्य ओळखून अखेर उपनगर पोलिसांनी बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण केले. ‘गुगल’ श्वानाने घटनास्थळी पोहोचून चिमुकलीचे दुसरे कपडे हुंगले आणि धावतच सुटला. श्वानाने दाखविलेल्या मार्गाने पोलीसही धावू लागले. यावेळी वाटेत चिमुकली अंधारात एकटीच चालत येत असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडली.