इन्स्टाग्रामवर एमडीचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सराईत गुंडाला ठोकल्या बेड्या
By अझहर शेख | Published: January 18, 2024 04:23 PM2024-01-18T16:23:24+5:302024-01-18T16:25:14+5:30
१ लाखाची २०ग्रॅम पावडर हस्तगत.
अझहर शेख, नाशिक : कारमध्ये बसून एमडी (मॅफेड्रोन) पावडर सेवन करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मागीलवर्षी व्हायरल झाला होता. तेव्हापासून गुन्हे शाखा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याच्या मागावर होती. युनिट-१च्या पथकाला खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून ‘टिप्पर’गँगमधील सराईत गुन्हेगार असलेला संशयित निखील बाळू पगारे (२९,रा.पाथर्डीफाटा) यास अखेर गुन्हे शाखा युनिट१च्या पथकाने त्याच्या साथीदारासह शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १लाख रूपये किंमतीची २० ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर हस्तगत करण्यात आली आहे.
सिडको परिसरातील मोठ्या टिप्पर गँगमधील गुंड संशयित निखील पगारे याने मागीलवर्षी स्वत:च्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केला होता. यामध्ये तो एमडी ड्रग्जची पुढी उघडून सेवन करताना दिसत होता. मात्र व्हिडिओमध्य त्याची पाठीमागील बाजू असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलिस त्याचा शोध घेत असताना पोलीस नाइक मिलींदसिंग परदेशी यांना पगारे हा एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ यांना कळविले. यावेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डीजवळील दामोदरनगर येथे सापळा रचला.
याठिकाणी संशयित निखील व त्याचा साथीदार सराईत गुन्हेगार कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव (२२,रा. उत्तमनगर) हेदोघे एमडी विक्री करण्यासाठी आले असता सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, उपनिरिक्षक चेतन श्रीवंत, हवालदार शरद सोनवणे, मुख्तार शेख, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, धनंजय शिंदे, रमेश कोळी, जोगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी आदींच्या पथकाने शिताफीने या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनांत डांबले. त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २०ग्रॅम एमडी पावडर आढळून आल्याची माहिती ढमाळ यांनी दिली आहे. यांच्याविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमडीची नशा; गावठी पिस्तुल विक्री
संशयित निखिल हा सराईत गुन्हेगार असून तो स्वत: एमडी ड्रग्जची नशा करतो आणि गावठी पिस्तुलचीही तस्करी करतो, असे तपासात समोर आले आहे. त्याने काही दिवसांपुर्वीच जुने नाशिकमधील संशयित मोहम्मद सय्यद याच्याकडे एक काडतुससह पिस्तुल विक्रीकरिता दिले होते. त्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली. त्यानंतर पगारेलाही घाऱ्यासह ताब्यात घेतले. भद्रकाली पोलिस ठाण्यात पगारेविरूद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे.