सराईत गुंडांनी ५० हजारांची खंडणीसाठी गुन्हेगारालाच धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:21+5:302021-03-19T04:15:21+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०१६साली पंचवटीत एका तरुणाच्या झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार संशयित जयेश हिरामण दिवे व संशयित ...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०१६साली पंचवटीत एका तरुणाच्या झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार संशयित जयेश हिरामण दिवे व संशयित पवन शिवाजी कातकाडे (३३,रा.इंदिरानगर) हे दोघेही सहआरोपी आहेत. त्यांची यापूर्वी न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. या गुन्ह्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीकरिता दोघेही न्यायालयाच्या आवारात हजर राहिले असता दिवे याने कातकाडे याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कातकडे याने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित दिवे व त्याचा दुसरा साथीदार संशयित अरुण गायकवाड (४०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या गुन्ह्यात कातकाडे, दिवे हे सहआरोपी आहेत. बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास न्यायालयात सुनावणीसाठी संशयित आले होते. त्यावेळी पवन हा रोहित उघडेसोबत बसलेला असताना संशयित दिवे व गायकवाड यांनी कातकाडेस जिवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. यामुळे कातकाडे सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
--इन्फो--
जयेश दिवेविरुद्ध खुनाचे तीन गुन्हे
संशयित जयेश दिवे याच्याविराेधात यापूर्वी तीन खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्ह्यांसह एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. तसेच संशयित अरुण गायकवाडविरोधात मारहाणीचा गुन्हा याअगोदर दाखल आहे. दिवे हा सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्याच्यासह टोळीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली होती.