शुभवर्तमान : महापालिका शाळांमधील सुखद कामगिरी; शंभर टक्के यश महिला शिक्षक झाल्या ‘तंत्रस्नेही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:38 AM2017-12-03T00:38:06+5:302017-12-03T00:39:14+5:30
डिजिटलच्या जमान्यात महापालिकाच्या शाळांनीही मागे राहून कसे चालेल? तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत असताना अध्यापनासाठी विविध व विपुल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे सुलभीकरण व्हावे याकरिता महापालिकेच्या शाळांमधील सर्वच्या सर्व ६५८ महिला शिक्षकांना तंत्रस्नेही (टेक्नोसॅव्ही) करण्यात यश आलेले आहे.
नाशिक : डिजिटलच्या जमान्यात महापालिकाच्या शाळांनीही मागे राहून कसे चालेल? तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत असताना अध्यापनासाठी विविध व विपुल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे सुलभीकरण व्हावे याकरिता महापालिकेच्या शाळांमधील सर्वच्या सर्व ६५८ महिला शिक्षकांना तंत्रस्नेही (टेक्नोसॅव्ही) करण्यात यश आलेले आहे. त्याचा लाभ तंत्रस्नेही विद्यार्थी तयार करण्यासाठी होणार आहे. महापालिकेतील शाळांमधील ही कामगिरी सुखद वार्ता ठरली असून, तंत्रस्नेही शिक्षकांची फळी निर्माण करणारी राज्यातील बहुधा पहिली महापालिका असावी.
महापालिकेच्या वतीने शहरात १२७ शाळा चालविल्या जातात. या शाळांमधील सुमारे ९५० शिक्षकांपैकी ६५८ महिला शिक्षक आहेत. शासनाच्या धोरणानुसार, शिक्षकांनीही तंत्रस्नेही होत त्याचा अध्यापनात प्रभावीपणे वापर केला पाहिजे. त्याचाच आधार घेत नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने महिला शिक्षकांना तंत्रस्नेही करण्याचा विडाच उचलला. त्यासाठी अगोदर तंत्रज्ञानाशी अवगत असलेल्या चार महिला शिक्षकांची निवड करण्यात आली. या महिला शिक्षकांनी शहरातील नामवंत खासगी शाळांमधील अद्ययावत लॅबच्या माध्यमातून विभागनिहाय व केंद्रनिहाय मनपा शाळांमधील महिला शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या. प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाची माहिती या कार्यशाळांमधून देण्यात आली. जुलै ते सप्टेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या या कार्यशाळांमध्ये २२ वयोगटापासून ते निवृत्तीकडे झुकलेल्या महिला शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्व्हर कसे आॅपरेट करावे, अपलोड सिस्टम, यूट्यूब, ब्लॉग, व्हॉट्सअॅप, फेसबुक याँसारख्या सोशल मीडियाचा कशा प्रकारे वापर करून घ्यावा याची माहिती देण्यात आली. शिक्षकांना काही प्रकल्प तयार करण्यास सांगण्यात आले. ज्या कविता सर्वच स्तरावर चालू शकतील अशा कविता संगीतबद्ध करून त्यांचे फोल्डर तयार करण्यात आले. सदर कविता त्यामुळे एकाच सुरात व एकाच तालात सर्वत्र गाता येऊ शकतील. या कार्यशाळांतून महापालिकेच्या सर्वच्या सर्व ६५८ महिला शिक्षक आता तंत्रस्नेही बनल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.