गॅस एजन्सीवरील कारवाई गुलदस्त्यात
By admin | Published: December 25, 2014 01:48 AM2014-12-25T01:48:15+5:302014-12-25T01:48:27+5:30
गॅस एजन्सीवरील कारवाई गुलदस्त्यात
मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील गॅस एजन्सीच्या मनमानीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे कलिम सिकंदर अन्सारी यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावर सुमारे पंधरा दिवसांनंतर केलेल्या कारवाईची माहिती घेतली असता पुरवठा अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसानंतर अर्जदाराला जबाब घेण्यासाठी बोलाविल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अन्सारी यांनी २४ नोव्हेंबर, रोजी दिलेल्या तक्रार अर्जात सदर गॅस एजन्सी मनमानी पध्दतीने कारभार करत असून, नवीन गॅस जोडणी घेण्यासाठी तवा, शेगडी, चहापत्ती, लाइटर, कुकर घेण्याची सक्ती करते. या वस्तू देताना बाजारभावापेक्षा जास्त किंमत आकारते. या वस्तू न घेतल्यास गॅसची जोडणी देण्यास टाळाटाळ करत असून, गॅस जोडणी अर्जासाठी वेगळे ७५ रुपये घेते; मात्र त्याची कोणतीही पावती देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एजन्सीच्या व्यवस्थापकाकडे तक्रार बुकची मागणी केली असता दिले जात नाही. एजन्सीज ग्राहक संरक्षण कायदा १९८६चे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सदर एजन्सीची नियमानुसार चौकशी करून त्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या अर्जावर केलेल्या कारवाईविषयी माहिती गुलदस्त्यात असून, येथील पुरवठा अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवसांनंतर चौकशी केली असता सदर तक्रारदार आपल्या समोर बसलेले असून, त्यांचे जबाब घेण्यात येत असल्याचे सांगितले. शासनाच्या नियमानुसार कोणताही तक्रार अर्ज आठ ते दहा दिवसांत निकाली काढण्याचा नियम असल्याची माहिती आहे.
मात्र, या तक्रार अर्जावर पंधरा दिवसानंतर जबाब घेण्यात येतो. यावरून संबंधित विभाग दुकानदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात. या नागरिकांच्या आरोपाला
पुष्टी मिळते. संबंधित दुकानाविरोधात कामय तक्रारी असूनही कोणतीही कारवाई करण्यात आली
नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)