गावगाड्याचा कारभार : तोडफोडीचे राजकारण; अनेकांचे गुडघ्याला बाशिंंग
By admin | Published: December 3, 2014 11:12 PM2014-12-03T23:12:35+5:302014-12-03T23:14:07+5:30
सरपंचपदासाठी हालचाली गतिमान
बागलाण : तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतींच्या २८५ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. आता याच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गावगाड्याची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, अनेक ठिकाणी बहुमतासाठी तोडफोडीचे राजकारण आहे तर बिगर आदिवासी क्षेत्रातील बहुतांश सरपंचपद राखीव असल्यामुळे ‘दुधावरची तहान, ताकावर भागविण्यासाठी’ इच्छुकांनी उपसरपंच पदासाठी व्यूहरचना आखल्याने ऐन थंडीत ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.
तालुक्यातील अजमीर सौंदाणे, नांदिन, भडाणे, खामलोन, पारनेर, वायगाव, नवे निरपूर, पिंगळवाडे, फोफीर, जुने निरपूर, सुराणे येथील सरपंचपदाच्या लढती लक्षवेधी आणि चुरशीच्या होणार आहेत. अजमीर सौंदाणे येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी सोसायटीचे सभापती मंगेश पवार यांच्या मातोश्री सुभद्रा पवार, ऊर्मिला पवार, जिजाबाई कुवर, अंजना गवळी या चौघींमध्ये रस्सीखेच आहे. बहुमतासाठी तोडफोडीच्या राजकारणात कोण यशस्वी होते यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. पिंगळवाडे येथे कृष्णा भामरे यांच्या पॅनलने बाजी मारली. मात्र सरपंचपद खुले असल्यामुळे या पदासाठी विठ्ठल भामरे, भाऊसाहेब भामरे, शांताराम भामरे या तिघांमध्ये रस्सीखेच असल्यामुळे ऐनवेळी पॅनलच्या सूत्रधारापुढे पेच निर्माण होऊ शकतो. फोफीर येथील सरपंचपद महिलांसाठी खुले असून, या पदासाठी राजसबाई भामरे, भागाबाई भामरे हे दोघे दावेदार मानले जात आहेत. भाऊबंदकी कोणाला टेकू देते यावरच दोघांचे भवितव्य अवलंबून आहे. नवे निरपूर ही महिलांसाठी खुले आहे या पदासाठी संगीता सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी या दोघांमध्ये जुंपण्याची शक्यता असून, आदिवसी सदस्य कुणाच्या पारड्यात वजन टाकतात त्यावरच जय पराजय अवलंबून आहे. वायगाव येथे अशोक अहिरे, भारत अहिरे यांची सर्व जागा हस्तगत केल्या असल्या तरी या पदासाठी कल्पना अहिरे, सरस्वती अहिरे आणि तनुजा अहिरे या इच्छुकांची संख्या पाहता येथील चित्र बदलू शकते. खामलोन येथील सरपंचपद महिलांसाठी खुले असून, सत्तेच्या किल्ल्या ताब्यात घेण्यासाठी प्रमिला धोंडगे, अर्चना पाटील, बेबी धोंडगे या सरसावल्या आहेत येथील वाडा परंपरा कुणाला तारते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पारनेर येथील सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. अंजना देवरे या एकमेव ओबीसी सदस्य असून त्याच सरपंचपदी विराजमान होतील. भडाणे येथे सरपंचपद खुले असले तरी महिलाराज अपेक्षित आहे. (वार्ताहर)