सरकारची काटकसर; पुरक पोषण आहारातून तेलाऐवजी साखरेची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:38+5:302021-06-03T04:11:38+5:30
नाशिक : गरोदर, स्तनदा माता व लहान बालकांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारातून सरकारने तेल गायब ...
नाशिक : गरोदर, स्तनदा माता व लहान बालकांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारातून सरकारने तेल गायब झाले असून, त्याऐवजी साखरेची मात्रा देण्यात आली आहे. तेल न देण्यामागचे कारण शासनाने स्पष्ट केले नसले तरी गेल्या वर्षभरापासून तेलाच्या किमती भडकल्याने पुरवठादाराला ते परवडत नसल्याचे कारण खासगीत सांगितले जात आहे.
आदिवासी व ग्रामीण भागातील स्तनदा, गरोदर मातांचे उदरभरण व्यवस्थित व्हावे, जेणेकरून उदरातील बाळाचे पोषण योग्य पद्धतीने व्हावे व स्तनदा मातेला पुरेसे दूध यावे, यासाठी ही योजना चालविली जाते. तीन महिन्यांच्या गर्भवती महिलांची यासाठी नोंदणी केल्यानंतर तिला दरमहिन्याला ताजा व सकस पूरक आहार पोहोचविण्यात येतो. त्यात महिलेला कॅलरीज अधिकाधिक मिळावा. हा त्यामागचा हेतू असून, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांनादेखील याच योजनेतून आहार दिला जातो. आजवर या पोषण आहारातून चवळी, चणा, मूगडाळ, मसूरडाळ, मिरची पावडर, हळद, मीठ व तेल दिले जात होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून शासनाने तेलाऐवजी साखर देण्यास सुरुवात केली आहे. सध्या तेलाचे भाव लीटरमागे दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पोहोचल्याने तेल देणे ठेकेदाराला परवडत नसल्याचे सांगण्यात येते.
-------------
* बालकांना चवळी, चणा, मूगडाळ, मसूरडाळ, गहू, मिरची पावडर, हळद, मीठ, साखर असा सुमारे १६६ ग्रॅमचा पोषण आहार दिला जातो.
* गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांनादेखील चवळी, चणा, मूगडाळ, मसूरडाळ, गहू, मिरची पावडर, हळद, मीठ, साखर असा सुमारे १९५ ग्रॅम आहार दिला जातो.
* बालकांना उपमा, सुगडी, भात, भुईमूग, गुळ, शेंगदाणे, फुटाणे, खोबरेलतेल, बटाटे, मूग असा अतिरिक्त पोषण आहार दिला जातो.
---------------
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यस्तरावरूनच पोषण आहार प्रत्येक लाभार्थ्यांना निश्चित करण्यात आला असून, ठेकेदाराकरवी तो थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो. या आहारासाठी वैद्यकीय अभ्यासाचा विचार केला जातो व त्याआधारेच पोषण आहार ठरतो. स्थानिक पातळीवर त्यात बदल करण्याचे अधिकार नाहीत. या आहाराव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर पुरक पोषण आहार दिला जातो.
- दीपक चाटे, महिला व बालकल्याण अधिकारी
--------------
फोडणी कशी द्यायची
पोषण आहारात एप्रिल महिन्यापासून बदल करण्यात आला आहे. तेल देणे बंद झाल्याने अन्य साहित्याला फोडणी देण्यासाठी विकतचे तेल आणावे लागते.
- सुनंदा भोये
--------------
तेलाचे भाव खुल्या बाजारात भडकले आहेत. दीडशे ते दोनशे रुपये दर झाल्यामुळे ग्रामीण भागात ते खरेदी करण्याची आर्थिक ऐपत नसते. त्यामुळे पोषण आहार शिजवण्याचा प्रश्न आहे.
- यमुना गांगुर्डे
------------
पोषण आहारामुळे स्तनदा, गरोदर मातांना चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. ग्रामीण भागातील गरीब महिलांना पोषण आहार हाच एकमेव आधार आहे.
- विमल आहेर
----------------
पूरक पोषण आहार योजना-
एकूण लाभार्थी-
सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी- ३,८७,३७३
गरोदर महिला लाभार्थी-
स्तनदा माता-