शासनाचा धिक्कार, पालकमंत्र्यांवर प्रहार...!
By admin | Published: November 30, 2015 11:56 PM2015-11-30T23:56:29+5:302015-11-30T23:58:06+5:30
पाणी पळवापळवी : भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी पाळला काळा दिवस
नाशिक : महापालिकेच्या पाणी आरक्षणात जलसंपदा मंत्रालयाने कपात केल्यानंतर उपलब्ध परिस्थितीत फेरनियोजन करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष महासभेत भाजपा वगळता अन्य सर्वपक्षीय सदस्यांनी विविध सूचना करतानाच नाशिककरांचे हक्काचे पाणी पळविणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार करण्यासह पालकत्वाची जबाबदारी झटकणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीकेचे प्रहार केले. महासभेपूर्वी महापौरांसह सर्व सदस्यांनी अंगात काळे डगले घालून महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानापासून मोर्चा काढत शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहाकडे प्रस्थान केले. भाजपा वगळता सर्वपक्षीय सदस्यांनी अंगात काळे डगले घालत ‘काळा दिवस’ पाळला, तर भाजपा गटनेत्याने धरणात पुरेसे पाणी असल्याचे सांगत पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका स्पष्ट केल्याने अन्य सर्वपक्षीय सदस्य भाजपावर तुटून पडले. पाणीबचतीसंबंधी उपाययोजनांवर विशेष महासभा बोलाविण्यात आली होती.