‘मेक इन नाशिक’ला शासनाचे सहकार्य

By admin | Published: April 12, 2017 01:44 AM2017-04-12T01:44:20+5:302017-04-12T01:44:33+5:30

पालकमंत्री गिरीश महाजन : नाशिकचे ब्रॅँडिंग करण्याचे आश्वासन

Government cooperation with 'Make in Nashik' | ‘मेक इन नाशिक’ला शासनाचे सहकार्य

‘मेक इन नाशिक’ला शासनाचे सहकार्य

Next

सातपूर : मुंबईत आयोजित ‘मेक इन नाशिक’ उपक्रम यशस्वीतेसाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करून गुंतवणुकीसाठी नाशिकचे ब्रँडिंग केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्याने नाशिकच्या उद्योग जगतात समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत नेहरू सेंटर येथे ‘मेक इन नाशिक’ या उपक्र माचे दि. ३० व ३१ मे रोजी आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याबाबत शासकीय पातळीवर काय करता येईल यासाठी मंगळवारी (दि.११) मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत निमा पदाधिकाऱ्यांची तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक झाली. शासकीय पातळीवर सर्वप्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन मंत्रीद्वयींनी दिले आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने नाशिकचा औद्योगिक विकास खुंटला आहे.
विदर्भ मराठवाड्याला वीजदरात सवलत दिल्याने नाशिकच्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावेत, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा, दिंडोरीला दोन वर्षांपासून ४०० हेक्टर जागा संपादित केली असली तरी अद्याप प्लॉटिंग झालेले नाही. अशा अनेक समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला ‘मेक इन नाशिक’ हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मुंबईतील मोठ्या उद्योगांशी, मर्चंट्स एक्स्पोर्ट्स, विविध देशांचे दूतावास यांच्याशी संवाद साधून नाशिकच्या विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचे शासकीय स्तरावर सर्व सहकार्य लाभणार आहे. बैठकीला आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, हेमंत टकले, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, सरचिटणीस उदय खरोटे, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, सुरेश माळी, प्रदीप पेशकार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Government cooperation with 'Make in Nashik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.