शासनाची कर्जमाफी फसवी
By admin | Published: June 18, 2017 12:38 AM2017-06-18T00:38:29+5:302017-06-18T00:44:46+5:30
देवीदास पवार : सरकार चले जावची भूमिका घेऊन पुन्हा उतरणार रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : भाजपा सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी केलेली असताना तत्त्वत:, सरसकट आणि निकषांच्या आधीन असलेली सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी आहे. त्यामुळे सातबारा कोरा करा या मागणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सरकार ‘चले जाव’ची भूमिका घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी दिला.
तातडीने द्यावयाच्या दहा हजार
रुपये पीककर्जाचे आदेश त्यातील निकषही शेतकऱ्यांचा अंत पाहणारे आहेत, त्यामुळे ही कर्जमाफीही फसवी असून, सातबारा कोरा होणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. याच मागणीकरिता आता सरकारच्या विरोधात उभे रहावे यावर शेतकरी संघटनेकडून विचारमंथन सुरू झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून थांबला आहे, तर सरकारने तातडीने दहा हजारांचे पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले असले तरी सरकारी इतर बँकांना अद्यापही तसे निर्देश नाहीत. ही योजना राबवायला सरकारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही, आदेश मात्र निघत आहेत. त्याची अंमलबजावणी कोणी करायची? त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वत: आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व करायला पुढे आले पाहिजे. सातबारा कोरा व्हावा या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा ही घोषणा केलेली मागणी सरकारने पुर्ण करावी अन्यथा सरकार चले जावची भूमिका घेऊन संघटनेला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.शेतकऱ्यांमध्ये चिंता
देवळा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता ठेवलेले निकष पाहता बहुतांश थकबाकीदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या कर्जमाफीसाठी आपण पात्र ठरतो की नाही याबाबत शेतकरी जाणकार व्यक्तींकडून माहिती घेताना दिसत आहेत. थकबाकीदार असलेल्या सभासदांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.