शासनाची कर्जमाफी फसवी
By admin | Published: July 11, 2017 11:24 PM2017-07-11T23:24:31+5:302017-07-11T23:27:12+5:30
राजू शेट्टी : किसानमुक्ती यात्रेचे दिंडोरीत स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : सरकार निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरले असून, राज्यात दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यातील अटी कुणालाही मान्य नसून सरकारने दिलेल्या शब्दप्रमाणे सरकट कर्जमाफी दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. किसानमुक्ती यात्रेनिमित्त कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश आदींसह सुमारे आठ राज्यातील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी आपल्या तीस ते चाळीस वाहनांसह गुजरात राज्यात रवाना झाले.
यावेळी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथे आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, शेतकरीवर्गाने केलेला संप हा ऐतिहासिक होता. यशस्वी संपानंतर अपेक्षित असे परिणाम मिळायला हवे असताना तसे काही घडले नाही.
यावेळी दत्तात्रय पाटील, गंगाधर निखाडे, संदीप जगताप, डॉ. अनिल सातपुते, हृषिकेश पडोळ, सदानंद शिवले, योगेश गोसावी, भास्कर भगरे, सोमनाथ जाधव, नितीन देशमुख आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कवी संदीप जगताप त्यांनी संप काळात केलेल्या कवितांबद्दल राजू शेट्टी यांनी अभिनंदन करत दिल्ली जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी व्हावे व आपल्या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्यात, असे सांगितले. यात्रेसमवेत मंदसौरमधील प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सहा प्रतिमा व अस्थिकलश आहेत. ही यात्रा मध्य प्रदेशातील मंदासौर येथून सुरू होऊन नाशिक जिल्ह्यातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणामार्गे दि. १८ जुलै रोजी दिल्ली येथे पोहचणार आहे.
योगेंद्र यादव यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली व नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाची सुरुवात यशस्वी झाली असून, आता सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णच कराव्या लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.