लसीकरणात शासकीय कर्मचारी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:01+5:302021-07-30T04:15:01+5:30
मालेगाव : शहरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांची उदासिनता असल्यामुळे अतिशय संथगतीने लसीकरण सुरू असून लसीकरणाचे डोस उपलब्ध ...
मालेगाव : शहरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांची उदासिनता असल्यामुळे अतिशय संथगतीने लसीकरण सुरू असून लसीकरणाचे डोस उपलब्ध होत नसताना नागरिक गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. मालेगावी लसीकरणात शासकीय व आरोग्य कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोघांचेही शंभर टक्के लसीकरण झाले आहे. मात्र, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सर्वात कमी झाले आहे.
शहरातील ४ लाख ५७ हजार ६७८ पैकी ५४ हजार ४२२ जणांनी पहिला डोस घेतला असून ११.८९ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण झाले तर २१ हजार १६६ जणांनी दुसरा डोस घेतला असून ४.६२ टक्के दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले आहे. शहरातील २ हजार ९९२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला असून त्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे. तर १ हजार ९३० आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसराही डोस घेतला असून ६४.५१ टक्के त्यांचे लसीकरण झाले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे कोरोना लसीकरण करून घेतले आहे. २ हजार ९६१ शासकीय कर्मचाऱ्यांपैकी सर्वच कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतल्याने शंभर टक्के लसीकरण झाले आहे. २ हजार ९६१ पैकी १ हजार ८५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला असून ६२.४८ टक्के लसीकरण झाले आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने काेरोना लसीकरण करण्यात आले. त्यात शहरातील ६९ हजार १३१ ज्येष्ठ नागरिकांपैकी ११ हजार ७६९ जणांनी पहिला डोस घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे १७. ०२ टक्के लसीकरण झाले. शहरातील पहिला डोस घेतलेल्या ११ हजार ७६९ ज्येष्ठ नागरिकांपैकी ७ हजार ८५१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. साधारणपणे ११. ३६ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
इन्फो
४५ ते६० वयोगट
मालेगाव शहरातील ४५ ते ६० वयोगटातील ८९ हजार ८७१ लाभार्थ्यांपैकी १५ हजार ५४० जणांनी पहिला डोस घेतला असून त्यांचे १७.२९ टक्के लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी ८ हजार ४६४ जणांना दुसराही डोस देण्यात आला असून त्यांचे सुमारे ९. ४२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
इन्फो
१८ ते ४४ वयोगट
मालेगावात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण सर्वात कमी झाले आहे. २ लाख ९८ हजार ६७६ तरुणांपैकी केवळ २१ हजार १६० जणांना आरोग्य विभागामार्फत पहिला डोस डोस देण्यात आला. ७.०८ टक्के पहिल्या डोससाठी तरुणांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेतलेल्या २१ हजार १६० तरुणांपैकी १ हजार ७१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.