सरकारी आकडेवारीत कुपोषणाची सत्यता लपविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:32 AM2018-10-12T01:32:30+5:302018-10-12T01:33:00+5:30
सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.
नाशिक : सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.
नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे गुरुवारी (दि.११) योगदान सोहळ्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव दाम्पत्याचा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार २०१८’ प्रदान करून सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजीमंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमा पवार, सचिव डॉ. सुनील ढिकले, शशिकांत जाधव, वसंत खैरनार आदी उपस्थित होते.
डॉ. आशिष सातव म्हणाले, आदिवासींसाठी प्रामाणिकपणे काम करताना अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्याचे काम काही राजकीय व शासकीय यंत्रणेतील व्यक्तींनी केले. एकीकडे आपण चंद्रावर जात असताना दुसरीक डे आदिवासींचे कुपोषण देशातील वास्तविकतेचे दर्शन घडवित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्चूनही भारतात कुपोषण निर्मूलन होत नाही. त्यामुळे महान संस्थेच्या माध्यमातून मेळघाटातील उपोषण आणि त्याची वास्तविकता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मांडल्याने २००५ मध्ये राजमाता जिजाऊ मशीनच्या माध्यमातून आदिवासींचे कुपोषण सर्वेक्षण होऊन सर्व आदिवासी भाग कुपोषित जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अविनाश अहेर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश मंत्री यांनी केले. डॉ. प्राची पवार यांनी आभार मानले.
रुग्णच आमचे देवस्थान
मेळघाटातील वैद्यकीय सेवेच्या प्रवासाविषयी सांगताना महात्मा गांधीजी व विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जनसेवेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगतानाच आता रुग्ण हेच देवस्थान आणि रुग्णसेवा पूजा बनल्याचे डॉ. आशिष सातव म्हणाले. तर आदिवासींच्या जीवन अज्ञान, अंधश्रद्धेने व्यापून टाकलेले असल्याने तेथे रुग्णसेवा करणे आव्हानात्मक होते; परंतु जसजसे उपचार सुरू केले तसतसे त्यांच्याशी आत्मियतेचे नाते निर्माण झाल्याचे डॉ. कविता सातव यांनी सांगितले.
प्रत्येकाने स्वत:ची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. सैनिकांप्रमाणेच त्यांना लढण्यासाठी बळ देणाºया घटकाचा गौरव होणे आवश्यक असते. योगदान सोहळ्यातून डॉ. सातव दाम्पत्याच्या माध्यमातून मेळघाटात महान संस्थेच्या रुग्णसेवेत योगदान देणाºयांचाही सन्मान असल्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले.