शासनाच्या घरांबाबतचा निर्णय; एकलहरे ग्रामसभेत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:54 AM2018-10-29T00:54:40+5:302018-10-29T00:55:04+5:30
शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली.
एकलहरे : शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली. एकलहरे ग्रामसभा गुरुवारी सरपंच मोहिनी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणात्मक निर्णयानुसार वर्षानुवर्षे २०११ पर्यंत शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा धोरणात्मक निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. त्या निर्णयाचे ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी एस. जी. वाघ यांनी वाचन केले. एकलहरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिद्धार्थनगर वस्ती पाटबंधारे खाते व महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या संयुक्त जागेवर गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या शासकीय जागेवरील २०११ पर्यंतची घरे नियमानुसार करण्याचा निर्णयान्वये सिद्धार्थनगरमधील रहिवाशांना घरे व मूलभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार सिद्धार्थनगरमधील ७२९ पात्र अतिक्रमणधारकांची यादी ग्रामसभेत प्रसिद्ध करण्यात आली. ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, पंचायत समिती सदस्य विजय जगताप, उपसरपंच अशोक पवळे, ग्राम पंचायत सदस्य श्रीमान होलीन, नीलेश
धनवटे, विश्वनाथ होलीन, सुरेखा जाधव दिलीप जाधव, आदींसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आसाराम शिंदे व आभार सागर जाधव यांनी मानले.
शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे ग्रामपंचायतीला सिद्धार्थनगर परिसरात शासकीय योजना, विकासकामे करता येत नव्हती. महाराष्ट्र शासनाच्या अतिक्र मण नियमानुसार करावयाच्या धोरणात्मक निर्णयामुळे सिद्धार्थनगर येथे घरकुल योजनेसहित विविध विकासकामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - मोहिनी जाधव, सरपंच एकलहरे ग्रामपंचायत