"सरकार बेकायदेशीर असल्याने अधिकाऱ्यांनी आदेश पाळू नयेत"
By धनंजय रिसोडकर | Published: May 12, 2023 02:06 PM2023-05-12T14:06:41+5:302023-05-12T14:08:34+5:30
संजय राऊत : १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्रचा न्यायालयाचा निकाल
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही शिंदे, फडणवीस हे बेशरमपणे, निर्लज्जपणे निकाल हा आपल्या बाजूने लागल्याचे सांगत आहेत. हे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याने पोलीस, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेशदेखील पाळू नयेत, असे आवाहनदेखील ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिेषदेत केले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राऊत हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील विद्यमान सरकार हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयानेच म्हटले आहे. मिंधे गटाचा व्हीप बेकायदेशी, राज्यपालांचे आदेश बेकायदेशीर,गटनेतेपदी शिंदे यांची निवड अयोग्य असे सारे काही बेकायदेशीर असल्याने सरकारही बेकायदेशीरच आहे. जर उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेमुळे राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पुर्स्थापित केले असते, असे न्यायालयाने सांगणे म्हणजेच हे सरकार बेकायदेशी असल्याचा निर्वाळा दिल्याचेही राऊत यांनी नमूद केले.