शासकीय यंत्रणाही लागली कामाला

By admin | Published: September 20, 2016 11:54 PM2016-09-20T23:54:52+5:302016-09-20T23:55:13+5:30

जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक : वाहतूक, पार्किंग व्यवस्थेचे सादरीकरण

The government machinery also started work | शासकीय यंत्रणाही लागली कामाला

शासकीय यंत्रणाही लागली कामाला

Next

नाशिक : येत्या २४ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या तयारीस प्रशासकीय यंत्रणाही लागली असून, मोर्चाच्या कालावधीत वाहनांची पार्किंग, वाहतुकीचे मार्ग, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत घ्यावी लागणारी काळजी यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासनाने केलेल्या तयारीचे सादरीकरण करतानाच, मोर्चाच्या नियोजनाची माहितीही यंत्रणेला देण्यात आली.
दुपारी चार वाजता खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार माणिक कोकाटे, विजय करंजकर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत अगोदर आयोजकांनी मोर्चाची माहिती दिली. मोर्चासाठी होणारी गर्दी, त्यांच्या वाहनांची करण्यात आलेली सोय, वाहनतळ, मोर्चाचा मार्ग, निवेदन, मोर्चाचा समारोप आदि माहिती देण्यात आली.
तपोवनातील लॉन्स तसेच मोकळ्या जागेत वाहनांची सोय करण्यात येणार असली तरी, येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता, तपोवन परिसराला लागून असलेल्या मोकळ्या जागांचा वापर यासाठी करता येईल, परंतु मुख्य रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली. वाहनांची शिस्तबद्ध पार्किंग करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याशिवाय मोर्चाच्या मार्गाला येऊन मिळणाऱ्या उपरस्त्यांवरील वाहतूक मोर्चा परत गेल्यापर्यंत बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.
या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्याचेही सांगण्यात आले. नाशिक शहर पोलिसांनी यावेळी त्याचे सादरीकरणही केले. मोर्चाच्या काळात नोकरदार, शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण तसेच रुग्णांचा खोळंबा होऊ न देण्यासाठी वेगळी व्यवस्था काय करता येऊ शकते का याचाही विचार करण्यात आला. बहुतांशी शाळांना या दिवशी सुटी असेल असे सांगण्यात आले, त्यावर शासन स्वत:हून सुटी जाहीर करू शकत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोर्चातील उपस्थितीचा अंदाज पंधरा लाख इतका सांगण्यात आल्यावर तो कसा व कोठे सामावणार याची चर्चा करण्यात आली. साधारणत: दोन तास ही बैठक झाली. बैठकीस आमदार अनिल कदम, दिलीप बनकर, श्रीमती नीलिमा पवार, रंजन ठाकरे, अजय बोरस्ते, उद्धव निमसे, शैलेश कुटे आदि उपस्थित होते.

Web Title: The government machinery also started work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.