आदिवासी दिनाचा शासकीय कार्यक्रम पालघरमध्ये होणार
By संदीप भालेराव | Published: August 8, 2023 01:10 PM2023-08-08T13:10:39+5:302023-08-08T13:11:22+5:30
९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन साजरा केला जातो.
नाशिक : जागतिक स्तरावर साजरा होणारा आदिवासी दिन राज्य शासनाकडूनही साजरा केला जातो. यावर्षी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे शासकीय आदिवासी दिन होणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहेत.
९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन साजरा केला जातो. आदिवासी समाजाचा विकास आणि समृद्धीसाठी दरवर्षी बोधवाक्य निश्चित केले जाते. त्यानुसार यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आदिवासी तरुण हेच स्वनिर्णय बदलाचे प्रतिनिधी’ असे बोधवाक्य निश्चित केले असून त्या संकल्पनेवर आधारित पुढील वाटचाल केली जाणार आहे. यामध्ये हवामान बदल, स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येणे, पिढ्यापिढ्यांमधील सुसंवाद या तीन विषयांवर उपक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित भूषविणार आहेत.
यावेळी कृषी, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, चित्रपट व अभिनय, समाजसेवा ह्या क्षेत्रात यश मिळवलेल्या तसेच या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या आदिवासी बांधवांचा सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आदिवासी बांधव व सर्व नागरिक यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.