शासनाचा निषेध : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप;
By admin | Published: December 21, 2014 11:00 PM2014-12-21T23:00:35+5:302014-12-21T23:00:59+5:30
कर्जमाफीची मागणीदिंडोरीत राष्ट्रवादीचा रास्ता रोको
दिंडोरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बेमोसमी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांना चांगली मदत देऊ असे आश्वासन दिले; परंतु तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले, असला आरोप करीत दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने दिंडोरी येथे रास्ता रोको करत युती सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दिंडोरी येथे पालखेड चौफुलीवर नुकसानीमुळे खराब झालेली द्राक्षे रस्त्यावर ओतत आंदोलन केले . यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी युती सरकारवर हल्लाबोल करत मोदी शासन आल्यापासून शेतकरी नाडला जात असून, कांदा, टमाटे, सोयाबीन, मका, दूध, साखर अशा सर्वच शेतमालाचे भाव कमी ठेवण्याचे काम करत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले . आता महाराष्ट्रात एवढे नुकसान होऊनही तुटपुंजी मदत देत शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सरकारने तत्काळ संपूर्ण कर्जमाफी द्यावी व पुढील हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला . यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भगरे, रायुकॉँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, गंगाधर निखाडे आदिंची भाषणे झाली. यानंतर नायब तहसीलदार मोहन कनोजे यांना निवेदन देण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प होऊन विस्कळीत झाली.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सचिन देशमुख, राजेंद्र ढगे, कैलाश मवाळ, नरेंद्र पेलमहाले, श्याम हिरे, परिक्षित देशमुख, बाजार समितीचे संचालक वसंतराव जाधव, रघुनाथ पाटील आदि उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)