समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:56 AM2017-07-20T00:56:36+5:302017-07-20T00:58:24+5:30
समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार गिरीश महाजन : महामार्ग होणारच
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असून, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शेतकऱ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील नागपूरपासून शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे होत समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास सुरुवात केली आहे. अन्य भागातूनही या महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या समृद्धी महामार्गाला असलेल्या विरोधाकडे महाजन यांचे लक्ष वेधले असता, नाशिक जिल्ह्णासाठी अलीकडेच जमिनींचे दर जाहीर करण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यात आले आहेत. अन्य प्रकल्पांसाठी अगोदर सरकारकडून जमीन संपादित केली जात व नंतर शेतकऱ्यांना दहा, पंधरा वर्षांनंतर मोबदला मिळत होता परंतु या महामार्गासाठी थेट खरेदीने शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे व त्याचा मोबदलाही तत्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे काही प्रश्न असतील तर सरकारकडे चर्चेसाठी यावे सरकार चर्चेला तयार आहे असे सांगून, कोणत्याही शेतकऱ्याची जमीन बळजबरीने घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या गावांमध्ये मोजणी झालेली नाही तेथील शेतकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.