शासकीय आश्रमशाळांमध्ये होणार ‘सीक रूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:03 AM2019-01-11T02:03:21+5:302019-01-11T02:03:40+5:30
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘सीक रूम’ तयार केला जाणार असून, विद्यार्थ्यांना लागलीच उपचार मिळणार आहे. ‘सीक रूम’ उपलब्ध आहे अशा आश्रमशाळांमध्ये औषधसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘सीक रूम’ तयार केला जाणार असून, विद्यार्थ्यांना लागलीच उपचार मिळणार आहे. ‘सीक रूम’ उपलब्ध आहे अशा आश्रमशाळांमध्ये औषधसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक वैद्यकीय सुविधादेखील मिळत नाही. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असल्याने विद्यार्थ्यांना तेथे नेणेही शक्य होत नाही. परिणामी आजारी विद्यार्थ्यांच्या जिवाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सीक रूम तयार करण्यात येऊन तेथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
‘सीक रूम’ सक्षम करण्यासाठी या ठिकाणी फर्निचर, वैद्यकीय उपकरणे, प्रथमोपचार पेटी, याबरोबरच पाणी, बाथरूम आणि बेडची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सीक रूमचा प्राथमिक खर्च शासनाच्या आश्रमशाळा समूह योजनेतून करण्यात येणार असून, त्यानंतर खर्च दर महिन्यांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीचा खर्च शाळा व्यवस्थापन समितीच्या खर्चातून करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. याची जबाबदारी अधीक्षक आणि अधीक्षका यांची असणार आहे. त्यांच्यावर सीक रूमच्या सोयीसुविधांबरोबरच औषधांचा पुरवठा, कालबाह्ण औषधांची नोंदणी ठेवावी लागणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत ५०२ शासकीय आश्रमशाळा सुरू असून, सदर आश्रमशाळांमध्ये सुमारे १,९१,७२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
प्रकल्प अधिकाऱ्यांचा वॉच
अटल आरोग्य वाहिनीअंतर्गत ५३ शासकीय आश्रमशाळांमध्ये सीक रूमसाठी आवश्यक औषधे व उपकरणांचा पुरवठा शासनाकडून करण्यात येणार आहे. या सीक रूमवर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयाची तसेच सहायक प्रकल्प अधिकारी यांची नजर असणार आहे.