शासनाने तीस रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:29+5:302021-09-03T04:14:29+5:30
येवला : महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरीत्या थेट शेतकऱ्यांचा कांदा तीस रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी ...
येवला : महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरीत्या थेट शेतकऱ्यांचा कांदा तीस रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात तहसीलदार प्रमोद हिले यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या कांद्याला जो दर मिळत आहे त्यामध्ये उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये सड होण्याचे व वजन घटण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच आता कांद्याचे दर १२ ते १५ रुपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मागील वर्षी कांदा बियाण्याचे भाव पाच ते सहा हजार रुपये प्रति किलो होते. इतके महाग बियाणे शेतकऱ्यांनी घेऊन त्याची रोपे बनवली; परंतु रोपेदेखील ५० ते ६० टक्के लहरी हवामानामुळे सडून गेली. कांदा लागवड केल्यानंतर शेतामध्येच कांदेदेखील मोठ्या प्रमाणात खराब झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर आर्थिक सक्षम बनवायचे असेल तर त्याला हमीभाव देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून शासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय भोरकडे, गोकुळ भोरकडे, किरण खोकले, प्रवीण शिंदे, गणेश खोकले, खंडू मोरे, ज्ञानेश्वर भोरकडे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (०२ येवला ५)
020921\02nsk_14_02092021_13.jpg
०२ येवला ५