शासनाने कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:28+5:302021-04-25T04:13:28+5:30
सिन्नर : शासनाने कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीने यांनी सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे ...
सिन्नर : शासनाने कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीने यांनी सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला असून कोरोना संसर्गाने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाने मृत पावलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. शासन कोविड रुग्णांवर कोट्यवधी खर्च करून त्यांना उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार मोफत मिळत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे; परंतु दुसऱ्या बाजूला कोविड मृतदेह ताब्यात देताना व त्यावर अंत्यसंस्कार करताना रुग्णालय व नगरपालिका कर्मचारी, नातेवाइकांकडून हजारो रुपयांची मागणी करतात ही अतिशय निंदणीय बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने कोविड मृतदेहावर संपूर्ण अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक यांनी केली आहे. निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिकचे जिल्हा संघटक दत्ता शेळके व सिन्नर शाखेचे सचिव श्यामसुंदर झळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती माहितीसाठी मुख्याधिकारी सिन्नर नगरपालिका, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना पाठवण्यात आल्या आहेत.