शासनाने दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:48 PM2018-10-28T18:48:26+5:302018-10-28T18:48:52+5:30
सिन्नर : तालुक्यासह इगतपुरी तालुक्यातील टाकेद मंडळात सरासरीपेक्षाअत्यल्प पर्जन्यमान झाले असून तेथे दुष्काळ जाहीर करून तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी ...
सिन्नर : तालुक्यासह इगतपुरी तालुक्यातील टाकेद मंडळात सरासरीपेक्षाअत्यल्प पर्जन्यमान झाले असून तेथे दुष्काळ जाहीर करून तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर दौऱ्यावर आलेल्या मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावर्षी तालुक्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवत आहे. शासनाने पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याची मागणी निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी ऐवजी तहसीलदारांना सदरचे आधिकार देण्यात याव त्यामुळे विनाविलंब टॅँकर मंजुरी करणे शक्य होईल असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांच्या चाºयाची समस्या अवघड बनली असून चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्यात, शेतीची कामे नसल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असून रोहयो मार्फत तातडीने रोजगार हमीची कामे उपलब्ध करावी. इगतपुरी तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, वीज बिलांची सक्ती न करता शेतकºयांना अखंडीत वीजपुरवठा करावा. तसेच सिन्नर मतदारसंघात तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार वाजे यांनी निवेदनात केली आहे.
दुष्काळाच्या कठीण समयी शासन राज्यातील जनतेसोबत असून लवकरच दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन जलसंधारण मंत्री शिंदे यांनी आमदार वाजे यांना यावेळी दिले.