सरकारने महापालिकांना निधी द्यावा, कुठलेही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:27 PM2020-07-08T14:27:32+5:302020-07-08T14:34:10+5:30
कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत
नाशिक : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोरोना आजाराशी सामना करण्यासाठी मुबलक प्रमाणात निधीची उपलब्धतता केली जात आहे. सरकारने राज्यातील विविध महापालिकांनाही निधी वर्ग करून मदत करावी, यामध्ये कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत आहे, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशकात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून सुमारे साडेपाच हजाराच्यापुढे कोरोनाबाधितांचा आकडा सरक ला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.८) फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले. शहरातील जिल्हा शासकिय रूग्णालय, नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय, महसूल कार्यालयांना भेटी देत त्यांनी भाजपा शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी फडणवीस म्हणाले, रॅपिड अॅन्टिजन किट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे कोरोना निदानाच्या चाचण्यांचा वेग वाढणार आहे. सरकारकडून सर्व हॉटस्पॉटवर तातडीने तपासणी करण्याचे निर्देश स्थानिक मनपा व जिल्हा प्रशासनला दिले पाहिजे, तरच कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल. मनपा व जिल्हा प्रशासनाने कोरोनाशी दोन हात करताना केवळ कागदावरच तयारी करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात शहरात ती तयारी दिसून आली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंबईत ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’च्या तपासणीबाबत पुर्णपणे संभ्रमवस्था असून या तपासण्याच होत नसल्याची खंतही फडणवीस यांनी बोलून दाखविली. तसेच मास टेस्टिंगही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात कुठेही कोरोना नियंत्रणाबाबतची समाधानकारक स्थिती दिसत नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
मुंबईतील आकडा दिशाभूल करणारा
मुंबईमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची आकडेवारी ही पुर्णत: दिशाभूल करणारी आहे. तपासण्या केवळ ३३०० झाल्या म्हणूनच कोरोनाबाधितांचा आकडा ८०६ आला. यापेक्षाही अधिक भीषण परिस्थिती मुंबईत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा कमी पुढे यावा, म्हणून तपासण्यासुध्दा कमी केल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आरोग्य प्रशासनावर केला.मुंबईकरांचे आरोग्य पुर्णपणे धोक्यात टाकले जात आहे, असेही यावेळी म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुरघोडीचे राजकारण
अधिका-यांच्या बदल्यांमध्ये गडबड म्हणजे केवळ कुरघोडीचे राजकारण आणि संवादहिनता असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला घेरताना बदल्यांप्रकरणात शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते, हे सरकारचे दुर्दैव असल्याचे सांगितले. सरकारचे तीन ‘पॉवर सेंटर’ असल्यामुळेच ही अशी अवस्था होत असल्याचा चिमटाही त्यांनी काढला