कारागृहातील गणेशमूर्तींसाठी शासनाचा स्टॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:46 AM2019-09-01T00:46:03+5:302019-09-01T00:46:32+5:30
नाशिकरोड कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना बाजारपेठ मिळावी यासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला असून, तीन महिला बचतगटांच्या माध्यमातून शहरात तीन ठिकाणी या पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नाशिक : नाशिकरोड कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना बाजारपेठ मिळावी यासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला असून, तीन महिला बचतगटांच्या माध्यमातून शहरात तीन ठिकाणी या पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत मुख्य कार्याकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी प्रथमच या मूर्तींना खुल्या बाजारात आणले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत नाशिक जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह निर्माण करून त्यांची क्षमता बांधणी व त्या अंतर्गत असलेल्या महिलांचे उपजीविका वृद्धीचे काम केले जाते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या संकल्पनेतून व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके-कोळसे यांच्या मार्गदर्शनातून नाशिकरोड येथील मध्यवर्ती करागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या शाहू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
उमेद अभियानामार्फत समूहाचे नियोजन व तयारी करून अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक बंडू कासार, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, तालुका अभियान व्यवस्थापक स्वप्नील शिर्के यांनी मूर्ती विक्रीच्या स्टॉल्सचे नियोजन केले आहे. अभियानातील समूहांमार्फत नाशिक कारागृहातील बंदीवासी यांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या गणेशमूर्तीवरील तीन ठिकाणी उपलब्ध आहेत.
नाशिक शहरातील नागरिकांनी सदर समूहातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सदरील स्टॉलवरून गणेशमूर्ती खरेदी कराव्यात असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी केले आहे.
कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्तीना मोठी मागणी आहे. लोक आवर्जून अशा मूर्तींची मागणी करीत आहेत. शाडूमातीच्या इतर मूर्तीपेक्षाही कारागृहातील शाडूमातीच्या मूर्ती खूपच आकर्षक आणि रेखीव असल्याचा अभिप्राय ग्राहक देत आहेत.
- सुवर्णा दाते, शासकीय स्टॉलधारक मूर्तिविक्रेता
मोफत जागा उपलब्ध
उमेद अभियानात तालुक्यातील तीन समूहांना महापालिका प्रशासन यांच्या सहकार्याने मोफत विक्र ी केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पवननगर येथे राजमाता स्वयं सहाय्यता समूह, गोल्फ क्लब येथे सप्तशृंगी स्वयं सहाय्यता समूह, मातोरी तसेच आरटीओ कॉर्नर येथे भैरवनाथ स्वयं सहाय्यता समूह, चंदगिरी या ठिकाणी सदरील गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृह कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम यांनीदेखील सहकार्य केले.